केटीएचएम महाविद्यालय परिसरात विद्यार्थी सुरक्षिततेसाठी आता बिनतारी यंत्रणेचा (वॉकीटॉकी) वापर देखील सुरू करण्यात आला आहे. गंगापूर रस्त्यावरील ‘मविप्र’ शिक्षण संस्थेच्या विस्तीर्ण आवारात विविध महाविद्यालये असून एकटय़ा ‘केटीएचएम’ मध्ये तब्बल १८ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. टारगट व अनोळखी व्यक्तींचा वावर रोखण्यासाठी परिसरात सीसी टीव्ही कॅमेरे आधीपासून अस्तित्वात आहेत. त्यात नव्याने बिनतारी यंत्रणेचा समावेश करत सुरक्षारक्षकांमध्ये माहितीचे आदानप्रदान जलदगतीने करून गैरप्रकार रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी या पद्धतीचा अवलंब करणारे हे जिल्ह्यातील पहिलेच महाविद्यालय ठरले आहे.

Summer desi jugaad
उष्णतेपासून संरक्षणासाठी रिक्षाचालकाचा भन्नाट देशी जुगाड; रिक्षाच्या छतावरील काम पाहून कराल कौतुक!
Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
BJP using social media influencers for election campaign Lok Sabha elections 2024
निवडणूक प्रचारात इन्फ्लूएन्सर्सची एंट्री; भाजपाची काय आहे क्लृप्ती?
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा

गंगापूर रस्त्यालगत मविप्र शिक्षण संस्थेचे केटीएचएम महाविद्यालय, औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय, व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय आदींसह मराठा हायस्कूल, अभिनव बाल विकास मंदिर या शाळाही आहेत. एकटय़ा ‘केटीएचएम’चा विचार करता या ठिकाणी १८ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. शहरातील बहुतांश महाविद्यालयात टवाळखोरांचा उपद्रव होत असतो.  अनेक ठिकाणी त्यांचा मुक्त वावर असल्याने विद्यार्थिनींना छेडछाडीला तोंड द्यावे लागते. या घडामोडींमुळे सुरक्षिततेच्या मुद्यावर ओरड झाल्यानंतर महाविद्यालयांनी आपापल्या परीने उपाय करण्यास सुरूवात केली. सद्यस्थितीत सर्वच महाविद्यालयात प्रवेशद्वारावर खासगी सुरक्षारक्षक तैनात आहेत. काही महाविद्यालयांनी सीसी टीव्ही कॅमेरा यंत्रणा बसवून नजर ठेवली आहे. मध्यवर्ती भागात असणारे ‘केटीएचएम’मध्ये महाविद्यालयाशी संबंधित नसलेल्यांची भ्रमंती दृष्टिपथास पडते. संबंधितांमुळे यापूर्वी लहान-मोठे वादही झाल्याची उदाहरणे आहेत. शेजारील झोपडपट्टीतील टारगट विद्यार्थ्यांना दमदाटी करतात. याबद्दल पूर्वी एका शिक्षकाने जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्याला मारहाण करण्यात आल्याचे उदाहरण आहे.

केटीएचएम महाविद्यालयात अनाहुतांच्या संचारावर आणि संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सीसी टीव्ही कॅमेरा यंत्रणा अस्तित्वात आहे. या शिवाय, महाविद्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार, वाहनतळ, मैदान व परिसर, मागील बाजूचे मैदान अशा नऊ ठिकाणी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. महाविद्यालय परिसरात बाह्य व्यक्तीने प्रवेश केला अथवा काही अनुचित प्रकार घडला तर तो रोखण्यासाठी सुरक्षारक्षकांमध्ये समन्वय राहणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने नऊ बिनतारी यंत्रणा सुरक्षारक्षकांना उपलब्ध करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ. रमेश दरेकर यांनी दिली. तीन महिन्यांपासून कार्यान्वित झालेल्या या यंत्रणेचा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून चांगला उपयोग होत असल्याचे त्यांनी नमूद केले. ओळखपत्र गळ्यात असल्याशिवाय विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश दिला जात नाही. गर्दीत बाहेरील कोणी प्रवेश केलाच, तर बिनतारी यंत्रणेमार्फत सुरक्षारक्षक पुढील सहकाऱ्याला माहिती देऊन त्यास रोखू शकतात. विद्यार्थी सुरक्षिततेसाठी एखाद्या महाविद्यालयात बिनतारी यंत्रणेच्या वापराचा हा पहिलाच प्रयोग आहे.