कचरावेचक माय लेकीचा सत्कार

दिवाळीत घरोघरी होणारी स्वच्छता तशी नवीन नाही. ही स्वच्छता करताना अनवधानाने १३५ ग्रॅम सोन्याच्या व ३४७ ग्रॅम चांदीचा ऐवज कचऱ्यात फेकला गेला. त्या वस्तू पुन्हा मिळण्याची शाश्वती नसताना त्या परत मिळाल्याचा आनंद घेण्याचा अनुभव आणि प्रामाणिकपणा अजूनही जिवंत आहे ही दाखविणारी घटना इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. कचरावेचक माय-लेकींनी हा प्रामाणिकपणा दाखविला असून त्यांचा  सत्कार पोलिसांतर्फे करण्यात आला.

सार्वजनिक ठिकाणी एखादी वस्तू सापडली तर ती ज्या कोणाची गहाळ झालेली असेल, त्याला परत करण्याची मानसिकता बाळगणाऱ्यांची संख्या तशी दिवसागणिक कमी होत चाललेली. त्यात त्या वस्तू सोन्या-चांदीच्या असतील तर विचारायला नको, अशी स्थिती. परंतु, या नेहमीच्या समजला या घटनेने छेद मिळाला. अर्थात पोलिसांनी केलेले प्रयत्नही महत्वाचे ठरले.

पाथर्डी परिसरात महापालिकेचा कचरा डेपो आहे. या ठिकाणी अनेक महिला कचरा गोळा करण्याचे काम करतात. त्यातील गंगुबाई घोडे (५५, साठेनगर, गरवारे झोपडपट्टी) या मुलगी मुक्ता व सुनीता सोबत हे काम करतात. सात ते आठ दिवसांपूर्वी कचरा वेचताना त्यांना प्लास्टिकचा डबा मिळाला. त्यात मौल्यवान सोन्या-चांदीच्या वस्तू असल्याचे लक्षात आले. ही माहिती इंदिरानगर पोलिसांनाही मिळाली. गुन्हे शोध पथकाने गंगुबाई व त्यांच्या मुलींना इंदिरानगर पोलीस ठाण्यात आणले. संबंधितांकडे चौकशी केली असता त्यांनी सोन्याच्या वस्तू सापडल्याचे प्रामाणिकपणे मान्य केले. कचऱ्यात सापडलेला ऐवज कोणाच्या आहेत ते माहीत नाही. तसेच दिवाळीचे दिवस असल्याने आपणांस पोलीस ठाण्यात जमा करता आल्या नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात जमा केल्या. वासननगर परिसरात वास्तव्यास असणाऱ्या सरिता दळवी यांच्या घरातून दिवाळीच्या साफसफाईत या मौल्यवान वस्तू नजरचुकीने कचऱ्यात गेल्या होत्या. संबंधित कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. संबंधितांकडील देयके आणि वस्तूंचे वर्णन यांची पडताळणी व शहानिशा केल्यावर कचरावेचक मुलींना सापडलेल्या वस्तू त्यांच्याच असल्याचे निष्पन्न झाले. या तपासात गुन्हे शोधपथकाचे निरीक्षक के. बी. चौधरी यांच्या नेतृत्वाखाली  उपनिरीक्षक गावित, बेल्हेकर, हवालदार डी. पी. पाळदे, ए. ए. शेख, एस. डी. लांडे आदींच्या पथकाने महत्त्वाची भूमिका पार पाडली.

१० हजारांचे बक्षीस

कचऱ्यामध्ये माय-लेकींना सापडलेल्या डब्यामध्ये सोन्याच्या १३५ ग्रॅम वजनाच्या २० तर चांदीच्या ३४७ ग्रॅम वजनाच्या २२ ऐवजांचा समावेश आहे. ज्या माय-लेकींना हे सोने कचऱ्यात मिळाले, त्या गंगुबाई घोडे व त्यांच्या मुलीचा प्रामाणिकपणाबद्दल सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच या वस्तू ज्यांच्या होत्या, त्या दळवी यांना परत करण्यात आल्या. प्रामाणिकपणाबद्दल घोडे यांना दहा हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.