वत्सला खैरे यांची तक्रार

ऐन सणोत्सवात जुने नाशिक भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून त्यामागे पाणीपुरवठा विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांची बांधकाम विभागात केली गेलेली बदली हे कारण असल्याची तक्रार काँग्रेसच्या नगरसेविका वत्सला खैरे यांनी केली. त्यात तातडीने सुधारणा न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिल्यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सारवासारव करण्याची भूमिका घेतली.

स्थायी समितीच्या बैठकीत जुने नाशिक भागात तीन महिन्यांपासून पाणीपुरवठय़ाचा प्रश्न भेडसावत असल्याकडे खैरे यांनी लक्ष वेधले. मुबलक पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण तुडुंब भरले आहे. या स्थितीत खैरे गल्ली, कथडा, कुंभारवाडा आदी भागांत टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. एका भागात पाणी आले की, दुसऱ्या भागातील पाणीपुरवठा बंद होतो. गणेशोत्सव, ईदच्या काळात स्थानिकांना या अडचणींना तोंड द्यावे लागले. अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही दाद दिली जात नाही. बांधकाम विभागातील अधिकारी-कर्मचारी पाणीपुरवठा विभागात वर्ग करण्यात आले. त्यांना जुने नाशिक परिसरातील जलवाहिनींच्या जाळ्यांचे ज्ञान नाही व नियोजनाची गंधवार्ता नाही. पूर्वीच्या काळी जाणकार कर्मचाऱ्यांकडून योग्य पद्धतीने पाणीपुरवठा होत असे. कर्मचारी बदल्यांमुळे या संकटाला तोंड द्यावे लागत असून त्यावर तोडगा न काढल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही खैरे यांनी दिला.

एन डी पटेल रस्त्यावरील अग्निशमन दलाच्या इमारतीच्या दुरवस्थेवर त्यांनी बोट ठेवले. ही इमारत कधीही कोसळू शकते, असा इशारा त्यांनी दिला. या परिसरात भंगार व्यावसायिकांची दुकाने आहेत. संबंधितांच्या जुन्या गाडय़ा अस्ताव्यस्त पडलेल्या असतात. हे भंगार हटवून रस्ते मोकळे करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.