नाशिक : समाज माध्यमातून  एका व्यक्तीला पाच लाख ४१ हजार ९०० रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार मनमाड येथे घडला. याप्रकरणी मनमाड पोलीस ठाण्यात संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनमाड येथे संजय गरड (४५) कुटुंबासमवेत राहतात. मागील वर्षी जुलै महिन्यात व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून त्यांची लंडन येथील संशयित बेनका सन्चेझ हिच्याशी ओळख झाली. समाज माध्यमातून दिवसागणिक त्यांच्यातील मैत्री वाढत असताना बेनकाने मार्च महिन्यात लंडनहून भेटवस्तू पाठविली असल्याचे सांगितले. ही माहिती मिळताच त्यांना अबकारी शुल्क विभागातून संशयित सोनिया जैन यांचा दूरध्वनी आला. तुमचे काही पार्सल आले आहे, ते सोडविण्यासाठी बँक खात्यावर पैसे जमा करण्यास सांगण्यात आले.

सोनियाच्या सूचनेनुसार गरड यांनी काही विशिष्ट रक्कम खात्यावर जमा केली. नंतर पार्सल सोडविण्यासाठी विलंब शुल्क, आयकर अशी विविध कारणे दाखवत त्यांच्याकडून वेळोवेळी चार महिन्यांत पाच लाख ४१ हजार ९०० रुपये त्या खात्यावर जमा करण्यात आले. मात्र भेटवस्तूही मिळत नाही आणि दिवसागणिक शुल्काचा वाढता आकडा पाहून त्यांनी त्या खात्यावर पुन्हा सांगितलेली ६७ हजार रुपये रक्कम भरण्यास नकार दिला.

रक्कम भरण्यास नकार देताच संशयित बेनका तसेच सोनिया यांचे भ्रमणध्वनी, मेल, फेसबुकवरील खाते, व्हॉट्सअ‍ॅपवरील खाते सर्व संवादाची माध्यमे बंद झाली.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गरड यांनी मनमाड पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली.