जिल्ह्य़ातून ७ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी

नाशिक : राज्याचा इयत्ता १०वीचा निकाल अद्याप लागला नसला तरी ११वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस सुरूवात झाली असून जिल्ह्य़ातून आतापर्यंत सात हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेत सहभाग घेत आपला ‘संकेतांक’ प्राप्त केला आहे.

नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील सर्व उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य, उपप्राचार्य, तंत्रज्ञ यांचे ऑनलाइन प्रशिक्षण झाल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांसाठी खास प्रशिक्षण वर्ग ऑनलाइन घेण्यात आले. त्यानंतर विद्यार्थी नोंदणीस रविवारपासून सुरुवात झाली. जिल्ह्य़ात सात हजार ५६ विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिला भाग भरला. यामध्ये विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती, आईचे नाव, जन्मतारीख, परीक्षा क्रमांक, शाळा क्रमांक, पत्ता, शाळेचा तपशील भरण्यात आला आहे.

जिल्ह्य़ात २० हजारांहून अधिक विद्यार्थी ११वी प्रवेश प्रक्रियेत आहेत. जिल्ह्य़ात कला, विज्ञान, वाणिज्यसाठी २५ हजार जागा आहेत. मागील वर्षी यातील केवळ १९ हजार जागा भरल्या गेल्या होत्या.यंदा करोनामुळे लागू झालेल्या टाळेबंदीचा परिणाम प्रवेशप्रक्रियेवर होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. टाळेबंदीमुळे अनेक जण आर्थिक दृष्टचक्रात अडकले आहेत. उत्तर महाराष्ट्रातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होईल, तसेच ११वी हे वर्ष अभियांत्रिकी, वैद्यकीय वर्षांइतके महत्त्वाचे नसल्याने करोनाचा संसर्ग पाहता पालक आपल्या पाल्यांना आपल्याजवळ ठेवतील, अशी शक्यता प्रवेशप्रक्रिया समन्वयक वैभव सरोदे यांनी व्यक्त केली. तसेच आर्थिक कुचंबनेमुळे अनुदानितकडे कल वाढेल आणि जे पालक खासगी शिकवणी वर्गाकडे विद्यार्थ्यांना दाखल करून महाविद्यालयांशी करार करतात. त्याचाही परिणाम प्रवेशप्रक्रियेवर होण्याची शक्यता असल्याने मागील वर्षांच्या तुलनेत रिक्त पदांची संख्या कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.