धुळे : पावसाळ्यानंतर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील मोठे व मध्यम धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा कायम आहे. दोन्ही जिल्ह्यांतील पाणीसाठा तब्बल ९६.७६ टक्के क्षमतेपर्यंत भरलेला असून जवळपास १२ धरणे तुडुंब झाली आहेत.
धुळे पाटबंधारे विभागा तर्फे आज सकाळी (दि.१० नोव्हेंबर) दिलेल्या माहितीनुसार धुळे जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये १२ मोठ्या धरणांचा समावेश असून, त्यांचा एकत्रित उपयुक्त साठा १२.२६ टीएमसी असून, सध्या ११.४५ टीएमसी (३२४.१३ म्यूम) पाणी साठवण आहे. याशिवाय ४५ लघु प्रकल्पांमधून ०.३६ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. अशाप्रकारे धुळे जिल्ह्यातील एकूण पाणीसाठा १६.०३ टीएमसी असून, तो ९८ टक्के क्षमतेपर्यंत भरलेला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील रंगावली, सारंगखेडा आणि प्रकाशा या मध्यम प्रकल्पांबरोबरच सहा लघु प्रकल्पांचा समावेश आहे. नंदुरबारमधील मध्यम प्रकल्पांमध्ये ५.८९ टीएमसी साठा असून, लघु प्रकल्पांत ०.७० टीएमसी साठा आहे. मिळून एकूण पाणीसाठा ६.५९ टीएमसी इतका असून, तो ९८.५७ टक्के भरलेला आहे.
पांझरा, मालनगाव, जामखंडी, कनोली, बुराई, करवंद, अनेर, सोनवद, अक्कलपाडा, वाडीशेवाडी, अमरावता व सुलवाडे ही धुळेतील प्रमुख धरणे शंभर टक्के क्षमतेने भरलेली आहेत. त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातील रंगावली, सारंगखेडा व प्रकाशा ही तीनही धरणेही पूर्ण क्षमतेने भरलेली असून, पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक आहे.
धुळे पाटबंधारे विभागाच्या अहवालानुसार या वर्षी जूनपासून पर्जन्यमान चांगला झाल्यामुळे सर्व धरणे भरली आहेत. यामुळे आगामी रब्बी हंगामात शेतीसाठी, तसेच पिण्याच्या पाण्यासाठी कोणतीही कमतरता भासण्याची शक्यता नाही.
पाटबंधारे विभागाच्या ताज्या अहवालानुसार विभागातील सर्व ६१ प्रकल्पांत मिळून ९६.७६ टक्के क्षमतेचा पाणीसाठा असल्याने जलसंपत्तीची स्थिती अत्यंत समाधानकारक असून, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांसाठी ही सकारात्मक बाब मानली जात आहे.
