scorecardresearch

करोनाचे दिवसभरात २५८९ नवीन रुग्ण ; शहरापाठोपाठ ग्रामीण भागात रुग्णसंख्येत वाढ

मंगळवारी नाशिक मनपा क्षेत्रात १५७६, ग्रामीण भागात ८८१ व मालेगाव मनपा क्षेत्रात ३४ रुग्ण आढळले.

(संग्रहित छायाचित्र)

नाशिक : करोनाविषयक नियमांचे पालन न केल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते, याकडे खुद्द जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी लक्ष वेधूनही नियमावलीकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब रुग्णांच्या दैनंदिन आकडेवारीवरून समोर येत आहे. मंगळवारी दिवसभरात करोनाचे २५८९ नवीन रुग्ण सापडले. शहरापाठोपाठ ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत आहे.

गेल्या रविवारी जिल्ह्यात एकाच दिवसात तीन हजार ३५ रुग्णांचे अहवाल सकारात्मक आले होते. त्या वेळी नागरिकांनी करोनाचे नियम पाळून आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन करण्यात आले होते.

अन्यथा आगामी काळात निर्बंध कठोर करम्ण्याशिवाय गत्यंतर राहणार नसल्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. सार्वजनिक ठिकाणी नियमांकडे काही घटकांकडून आजही कानाडोळा केला जात असल्याचे दिसून येते. धार्मिक ठिकाणी भाविकांकडून गर्दी होत असून नियमांचे पालन करण्यात येत नसल्याचे दिसत आहे. मालेगावजवळील चंदनपुरी येथे परवानगी नसतानाही यात्रा भरल्याचे स्पष्ट झाले. कठोर कारवाई होत नसल्याने नागरिकांकडून नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे. स्थानिक यंत्रणांकडून कारवाई थंडावली आहे. या स्थितीत करोनाच्या रुग्णसंख्येत नव्याने भर पडत आहे.

मंगळवारी नाशिक मनपा क्षेत्रात १५७६, ग्रामीण भागात ८८१ व मालेगाव मनपा क्षेत्रात ३४ रुग्ण आढळले. ९८ रुग्ण जिल्हाबाहेरील आहेत. याच दिवशी १३७९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर नाशिक शहरात दोन करोनाबाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण अर्थात उपचाराधीन रुग्णांची संख्या १२ हजार ७५९ वर पोहोचली आहे. यात नाशिक शहरात ९४५८ तर ग्रामीण भागातील २७७०, मालेगाव मनपा क्षेत्रात २२८ आणि जिल्ह्याबाहेरील ३०३ जणांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 2589 new patients of corona in a day found in nashik district zws

ताज्या बातम्या