कृषक केंद्रात २७० टन आंब्यावर विकिरण प्रक्रिया
लासलगाव येथील डॉ. भाभा अणू संशोधन केंद्राच्या ‘कृषक’मधून यंदाच्या हंगामात आतापर्यंत २७० मेट्रीक टन आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून तो अमेरिकेला रवाना झाला आहे. आपल्या वैशिष्टय़पूर्ण अवीट चवीने जगभरातील खवय्यांना भुरळ पाडणारा हापूस आंबा लवकरच ऑस्ट्रेलियातही प्रवेश करण्याच्या मार्गावर आहे. यंदा नेहमीच्या तुलनेत निर्यात विस्तारणार असल्याचे चित्र आहे.
गेल्या काही वर्षांपासून भारतीय हापूस व इतर आंबे अमेरिकेला निर्यात केले जात आहेत. अमेरिकेच्या बाजारात कोणत्याही कृषी मालास प्रवेश करावयाचा असेल तर त्याला प्रथम २१ विविध निकषांचे अडथळे पार करावे लागतात. त्यात तो माल किटाणूविरहित असणे सर्वात महत्वाचे आहे. याकरिता आंब्यावर विकिरण प्रक्रिया करणे बंधनकारक असल्याने भाभा अणू संशोधन केंद्राने लासलगाव येथे खास केंद्राची उभारणी केली. आंब्याची जागतिक बाजारपेठ विस्तारण्याच्या उद्देशाने या केंद्राची धुरा काही काळ महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने स्वीकारली. सध्या हे केंद्र खासगी तत्वावर आंबा निर्यातदारांना सेवा पुरवत आहे. आतापर्यंत या केंद्रात २७० मेट्रीक टन आंब्यावर प्रक्रिया करून तो अमेरिकेला पाठविण्यात आला. त्यात हापूस, केसर, बेंगनपल्ली, दशहरा, लंगडा (आंध्रप्रदेश) यांचा समावेश आहे.
विकिरण प्रक्रियेद्वारे गॅमा किरणांचा मारा करून आंब्याची साठवणूक क्षमता वाढवली जाते. यामुळे आंबा पिकण्याची क्रिया तर लांबतेच, शिवाय कोयीतील किडही नष्ट होते. आंब्यातील साका (सफेद गाठ) निर्मितीची प्रक्रियाही थांबते. किड रोखण्यास हा अतिशय चांगला उपाय मानला जातो. उष्णतेचा वापर न करता ही प्रक्रिया होत असल्याने आंब्याचा स्वाद व ताजेपणा टिकून राहण्यास मदत होते. लासलगाव येथे विकिरण प्रक्रिया करून आंबे अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को, लॉस एन्जलिस, शिकागो, न्यू जर्सी, कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क या शहरांमध्ये पाठविले जात आहेत. २००७ पासून अमेरिकला भारतीय आंब्याची निर्यात सुरू झाली. तेव्हापासून आतापर्यंतचा आढावा घेतल्यास यंदा या केंद्रातून सर्वाधिक आंबे अमेरिकेला जाण्याची शक्यता आहे.
गतवर्षी या केंद्रातून ३२८ टन आंब्यावर प्रक्रिया करून तो अमेरिकेला पाठविला गेला होता. यंदा २० मेपर्यंत हा आकडा २७० टनवर पोहोचला आहे. पुढील किमान महिनाभर प्रक्रिया सुरू राहणार असल्याने यंदा सर्वाधिक निर्यातीची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच आंबा निर्यातीच्या यादीत नसलेल्या ऑस्ट्रेलियातही तो पाठविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या माध्यमातून निर्यातीला अधिक चालना मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेला झालेली निर्यात
२००७ – १५७ टन
२००८ – २७५ टन
२००९ – १२१ टन
२०१० – ९६ टन
२०११ – ८५ टन
२०१२ – २१० टन
२०१३ – २८१ टन
२०१४ – २७५ टन
२०१५ – ३२८ टन
२०१६ – २७० टन
(आतापर्यंत)

 

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 270 tons of mangoes export in us after radiation process
First published on: 24-05-2016 at 04:41 IST