अंदाजाप्रमाणे पाऊस झाल्यास धरणांची पातळी लवकर उंचावणार
लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : पावसाळा दारात उभा असून जिल्ह्य़ातील लहान-मोठय़ा २३ धरणांमध्ये सध्या ३१ टक्के जलसाठा आहे. माणिकपूंज हे एकमेव धरण कोरडे आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात ३३२५ दशलक्ष घनफुट अर्थात ३२ टक्के जलसाठा आहे. हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे समाधानकारक पाऊस झाल्यास या वर्षी सर्व प्रकल्प अपेक्षेपेक्षा आधीच भरू शकतील. गेल्या वर्षी जूनच्या प्रारंभी धरणांमध्ये केवळ सहा टक्के जलसाठा होता. गेल्या हंगामात प्रचंड पाऊस झाल्याने यंदा धरणांमध्ये बऱ्यापैकी पाणी आहे.
यंदा हंगामाच्या प्रारंभीच ‘निसर्ग’ चक्री वादळाचा तडाखा बसला. त्यावेळी अनेक भागात वादळी पाऊस झाला. त्यानंतरही अधूनमधून पाऊस हजेरी लावत असला तरी प्रमाण अल्प आहे. ११ दिवसांत जिल्ह्य़ात १०७ मिलीमीटर पाऊस झाला. सध्या जो जलसाठा शिल्लक आहे, तो गेल्या हंगामातील आहे. पाऊस लांबल्याने शहरात कपातीसारखा निर्णय घ्यावा लागल्याची उदाहरणे आहेत. तुलनेत यंदा तितकीशी चिंताजनक स्थिती नसल्याचे दिसून येते. जिल्ह्य़ात लहान मोठी एकूण २४ धरणे आहेत. शहराला गंगापूर आणि मुकणे धरणातून पाणी पुरवठा होतो. गंगापूर धरणात सध्या २६८४ दशलक्ष घनफुट (४८ टक्के), काश्यपी ३४१ (१८), गौतमी गोदावरी २६४ (१४), आळंदीमध्ये ३६ (चार) जलसाठा आहे. पालखेड धरणात ७८ (१२), १२५४ (२३), वाघाड १६८ (सात), ओझरखेड ८४८ (४०), पुणेगाव ६२ (१०), तिसगाव ३९ (९), दारणा ३७८० (५३), भावली ३६३ (२५), मुकणे १७३० (२४), वालदेवी १३७ (१२), कडवा ७६ (पाच), नांदुरमध्यमेश्वर २५३ (९८), भोजापूर २४ (सात) इतका जलसाठा आहे. गिरणा धरण समुहात चणकापूर ६४३ (२६), हरणबारी ४५८ (३९), केळझर ७१ (१२), नागासाक्या ६४ (१६), गिरणा ६२६१ (३४), पुनद ४४४ (३४) जलसाठा असल्याचे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे. गेल्या वर्षी जिल्ह्य़ात पावसाचे प्रमाण लक्षणीय होते. जमिनीत ओलावा असल्याने यंदा धरणातून विसर्ग करतांना पाण्याचा फारसा अपव्यय होणार नसल्याचे या विभागाला वाटते.
गतवेळेपेक्षा समाधानकारक स्थिती
मागील वर्षी पावसाळ्याच्या प्रारंभी जिल्ह्य़ातील आळंदी, पुणेगाव, तिसगाव, भावली, वालदेवी, नांदुरमध्यमेश्वर, चणकापूर, हरणबारी, केळझर, नागासाक्या, माणिकपूज ही धरणे कोरडीठाक होती. यंदा मात्र केवळ माणिकपूज धरणात पाणी नाही. उर्वरित सर्व धरणांमध्ये कमी-अधिक का होईना जलसाठा आहे. सध्या जिल्ह्य़ातील धरणांमध्ये २० हजार ७८ दशलक्ष घनफूट अर्थात ३१ टक्के पाणी आहे. गेल्यावेळी हे प्रमाण ३७४६ (सहा टक्के ) दशलक्ष घनफुट इतके होते. त्याच्याशी तुलना केल्यास यंदा २५ टक्के जलसाठा अधिक आहे.