१३५ गावांमधील चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील १३५ गावांमधील जवळपास चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यात कांद्याचे सर्वाधिक तर त्या खालोखाल गहू व डाळिंब, द्राक्ष पिकाचे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीची झळ ६ हजार ७७६ शेतकऱ्यांना बसली असताना जिल्हा प्रशासनाने त्यांचा अहवालात ‘लाभार्थी’ असा उल्लेख करत जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.
गेल्या रविवारपासून जिल्ह्यात गारपीट व अवकाळी पावसाचा तडाखा सहन करावा लागत आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने चार बळी घेतले. अनेक भागात शेतीचे मोठे नुकसान झाले. नैसर्गिक आपत्तीत बागलाण तालुक्यात सर्वाधिक १७३५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.
निफाड तालुक्यात ७३४, इगतपुरी ५३२, मालेगाव ४३०, नांदगाव ३५३, कळवण ४६, दिंडोरी ३८, सिन्नर ३४, येवला दोन, नाशिक तालुक्यात ०.४० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पावसाची सर्वाधिक झळ कांद्याला सहन करावी लागली. २४५५ हेक्टरवरील कांद्याचे नुकसान झाले.
गहू ८९७ हेक्टर, भाजीपाला १७९, डाळिंब १३१, हरभरा १३७, द्राक्ष ८९ आणि फळपिकांचे १५ हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवालात समोर आले आहे.
याच अहवालात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची माहिती देताना प्रशासनाने संबंधितांचा लाभार्थी असा उल्लेख केला. कृषिमंत्र्यांकडून आपद्ग्रस्तांना मदत देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
परंतु, शासकीय यंत्रणेतील लालफितीच्या कारभाराचा अनुभव लक्षात घेता ही मदत सर्व निकष पूर्ण होईपर्यंत मिळण्याची शक्यता धूसर असताना जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्तांना ‘लाभार्थी’ म्हटल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शासकीय पातळीवर कोणतीही मदत प्राथमिक अहवालावरून दिली जात नाही. ही बाब ज्ञात असूनही प्रशासनाने नुकसानग्रस्तांना थेट ‘लाभार्थी’ म्हणून कसे जाहीर केले, असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये उपस्थित केला जात आहे.
तालुकानिहाय नुकसानग्रस्त शेतकरी
* बागलाण – ३०००
* निफाड – १४२४
* नांदगाव – ९०७
* मालेगाव – ७५१
* इगतपुरी – ४३२
* सिन्नर – ९६
* कळवण – ९०
* दिंडोरी – ७३
* येवला – २
* नाशिक – १