भूमाता रणरागिणी ब्रिगेडचा इशारा
भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या ४०० महिला २६ जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता शनिशिंगणापूर येथील चौथऱ्यावर जाऊन शनीचे दर्शन घेणार असल्याचा इशारा ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई आणि युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय कुटे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
२० डिसेंबर रोजी शनिशिंगणापूर येथे भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या चार महिलांनी शनी चौथऱ्यावर दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी सुरक्षारक्षकांनी बळाचा वापर करीत महिलांना दर्शनापासून परावृत्त केले. या प्रकरणी संबंधित महिलांनी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. महिला प्रवेशाच्या मुद्दय़ामुळे शनी देवाला जास्त सुरक्षारक्षकांच्या बंदोबस्तात राहावे लागत आहे. शनी देवाची या संरक्षणातून मुक्तता करावी, या आमच्या संघटनेने राबविलेल्या आवाहनाला राज्यासह देशभरातून पाठिंबा मिळाल्याचे देसाई यांनी नमूद केले. भारतीय राज्यघटनेने महिला व पुरुषांना समान अधिकार दिले आहेत. त्यामुळे जनभावनेचा आदर करून शनिशिंगणापूर विश्वस्त मंडळाने २५ जानेवारीपर्यंत शनिशिंगणापूर येथील शनीचे दर्शन महिलांसाठी चौथऱ्यावरून सुरू करावे, अशी मागणी देसाई व कुटे यांनी केली. सकारात्मक निर्णय न झाल्यास प्रजासत्ताकदिनी ४०० महिला शनी चौथऱ्यावर जाऊन शनीचे दर्शन घेतील, असा इशारा त्यांनी दिला. ब्रिगेडच्या परिवर्तनवादी चळवळीला ओझर मिग येथील युवा प्रतिष्ठानने पाठिंबा दिल्याचे देसाई यांनी नमूद केले.