नाशिक: उन्हाची तीव्रता वाढत असल्याने ग्रामीण भागात टंचाईचे संकट घोंघावत आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी ३१ गाव-वाडय़ांवरील नळ योजना पूर्ण करणे, २३७ गाव-पाडय़ांवर नवीन विंधन विहिरी, विहिरींची खोली वाढविणे, खासगी विहिरींचे अधिग्रहण आणि जिथे काहीच पर्याय नाही अशा ८३५ गाव-वाडय़ांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागातील संभाव्य टंचाईला तोंड देण्यासाठी ५७९ गावे व ९२२ वाडय़ा असे एकूण १५०१ गाव-वाडय़ांचा समाविष्ट करीत ८६ कोटी ५७ लाखाच्या टंचाई कृती आराखडय़ास मंजुरी दिली आहे. २०२१-२२ वर्षांसाठी तयार केलेला आराखडा पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडे सादर करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयास पाठविण्यात आला. चालू वर्षांत पावसाचे प्रमाण चांगले होते. अगदी हिवाळय़ात बेमोसमी पावसाने हजेरी लावली होती. धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा आहे. त्यामुळे टंचाईची तीव्रता फारशी जाणवणार नसल्याची स्थिती होती. तथापि, आजवरचा अनुभव लक्षात घेत ग्रामीण भागात टंचाईची झळ बसू नये म्हणून आराखडय़ात विविध उपाय योजनांचा समावेश करण्यात आला आहे.
२९ गावात आणि दोन वाडय़ांवर अशा ३१ ठिकाणी नळयोजना प्रगतिपथावर आहे. त्या पूर्ण करण्यावर भर दिला जाईल. शिवाय अस्तित्वातील नऊ नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीसाठी ६३ लाखाचा खर्च गृहीत धरण्यात आला. एका गावात तात्पुरती पूरक नळ योजना प्रस्तावित आहे. सहा गावे आणि दोन पाडय़ांमध्ये आठ ठिकाणी विंधन विहिरींचे दुरुस्ती करण्यात येणार आहे. २६ गावे आणि पाच वाडय़ा अशा एकूण ३१ ठिकाणी विहीर खोलीकरणासाठी ३१ लाखाचा खर्च गृहीत धरण्यात आला. टंचाई निवारणाची मोठी भिस्त खासगी विहिरींवर असल्याचे लक्षात येते. १३१ गावात आणि १०१ वाडय़ा अशा २३२ ठिकाणी खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी एक कोटी ३६ लाखाचा खर्च अपेक्षित आहे.
टँकरसाठी ५० कोटी
टँकरमुक्त गावाची घोषणा वारंवार होत असल्या तरी पाण्यासाठी सधन मानल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील अनेक भागात उन्हाळय़ात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. या उन्हाळय़ात ३०५ गावे व ५३० गावे अशा ८३५ ठिकाणी टँकर वा बैलगाडीने पाणीपुरवठा करावा लागू शकतो. त्यासाठी आराखडय़ात सर्वाधिक ५० कोटीचा खर्च गृहीत धरला गेला आहे.टँकरने पाणी पुरवण्यासाठी दरवर्षी खर्च केला जातो.
मालेगाव, त्र्यंबकमधील अधिक गावे
संभाव्य टंचाईग्रस्त गावाच्या यादीत सर्वाधिक १२० गावे मालेगाव तालुक्यातील असून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ७० गावांचा समावेश आहे. सुरगाणा तालुक्यातील ६६, पेठ ५७, बागलाण आणि येवला प्रत्येकी ४९ गावे, सिन्नर ४३, दिंडोरी २७, निफाड १६, नांदगाव सात, इगतपुरीतील पाच गावांचा समावेश आहे. नाशिक तालुक्यातील एकही गाव आराखडय़ात नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 86 crore scarcity action plan approved base tanker rests on private wells amy
First published on: 01-04-2022 at 02:40 IST