मालेगाव : ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना २०२४ पर्यत शासनाच्या जलजीवन मिशन योजनेद्वार प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार मालेगाव तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी ९० कोटी रुपयांच्या आराखडयास मंजुरी मिळाली असल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.

जलजीवन मिशन योजनेद्वारे प्रत्येक घरात वैयक्तिक नळजोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रति दिन पाणीपुरवठा करणे तसेच ज्या गावांना पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत अपुरा आहे. त्याठिकाणी नव्याने स्त्रोत तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार १२ गाव योजनेतील गावांसाठी ४४ कोटीच्या आराखडयास मंजुरी मिळाली आहे. यामध्ये अतिरीक्त जलशुध्दीकरण केंद्र उभारणे, तसेच तळवाडे, बेळगाव ढवळेश्वार या ठिकाणांच्या वितरण जलकुंभापर्यंत जलवाहिनी टाकणे, गाव अंतर्गत जलवाहिनी टाकणे,अतिरिक्त जलकुंभ उभारणे आदी स्वरुपाची कामे केली जाणार आहेत.

अजंग,आघार बुद्रुक, चिंचवे गाळणे, दाभाडी, ढवळेश्वार (मित्रनगर), डाबली, दुंधे, गारेगाव, गरबड, कजवाडे, कंधाणे, काष्टी, खडकी, कुकाणे, कंक्राळे, कोठरे बुद्रुक आणि खुर्द, खाकुर्डी, लुल्ले, लेंडाणे, निळगव्हाण,निमशेवडी, नागझरी,नांदगांव खुर्द, मोरदर, टिपे,पोहाणे, रावळगाव, रामपुरा, सातमाने, सावतावाडी, वडगाव, वजीरखेडे, वळवाडे, वळवाडी, वडेल,वडनेर, झोडगे या ३९ गावांना पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलस्त्रोत बळकटीकरण, जलवाहिनी दुरुस्ती आणि नविन योजनांसाठी ३३ कोटी रुपयांच्या आराखडयास मंजुरी मिळाली आहे.

मालेगाव तालुक्यातील २६ गाव पाणीपुरवठा योजनेसाठी जलवाहिनी बदलणे, पंप बदलणे, गावअंतर्गत जलवाहिनी आदी कामांसाठी सुमारे ११ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. २५ माळमाथा योजनेतील गावांसाठी धरणाची उंची वाढविणे,गावअंतर्गत जलवाहिनी टाकणे, नळ जोडण्या देणे आदी कामांसाठी अडीच कोटीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या कामांचे अंदाजपत्रक लवकरच शासनास सादर करण्यात येणार असल्याचे भुसे यांनी कळविले आहे.