नाशिक : मराठी सारस्वतांचा कुंभमेळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास शुक्रवारपासून कुंभ नगरीत सुरूवात होत आहे. अधुनमधून हजेरी लावणारा अवकाळी पाऊस, बोचरा वारा आणि कमालीचा गारठा अशा वातावरणात होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी दुपारी ४.३० वाजता संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ तथा विज्ञान कथा लेखक डॉ. जयंत नारळीकर, मावळते अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या उपस्थितीत आणि लेखक विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहणार आहेत.

उन्हाळय़ात होणारे हे संमेलन करोनाच्या संकटामुळे हिवाळय़ापर्यंत पुढे ढकलावे लागले. शहराजवळील आडगावस्थित भुजबळ नॉलेज सिटी संमेलनानिमित्त कुसुमाग्रजनगरी झाली आहे. संमेलनाच्या तोंडावर करोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूचे संकट उभे राहिले. या मालिकेत अवकाळी पावसाची भर पडली. या घटनाक्रमात आयोजकांनी युध्दपातळीवर तयारी करीत पावसाने संमेलनातील कुठल्याही कार्यक्रमात अडथळा येणार नसल्याची व्यवस्था केली आहे. तीन दिवसात विविध विषयांवर परिसंवाद, बालकुमार साहित्य मेळावा, मुलाखत असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.

संमेलनाच्या उद्घाटन सोहळय़ाआधी शुक्रवारी सकाळी कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथून ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर ग्रंथ प्रदर्शन, नाशिक लेखक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. संमेलनाच्या उद्घाटनानंतर रात्री आठ वाजता निमंत्रितांचे कवि संमेलन होणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी १० वाजता मुख्य मंडपात डॉ. रामदास भटकळ यांची मुलाखत होईल. दुपारी नाशिकचे ज्येष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे आणि ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर यांचा सत्कार संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांच्या हस्ते होणार आहे. ११ वाजता ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या अध्यक्षतेखाली बालकुमार साहित्य मेळावा होणार आहे. करोनानंतरचे अर्थकारण आणि मराठी साहित्य व्यवहार या विषयावरील परिसंवाद जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली अभियांत्रिकी इमारतीच्या सभागृहात होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अध्यक्षांसाठी हेलिकॉप्टरऐवजी विमान?साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांना हेलिकॉप्टरने पुण्याहून नाशिकला आणण्याचे नियोजन आयोजकांनी केले होते. तथापि, अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि धुके यामुळे हेलिकॉप्टरऐवजी विमानाच्या पर्यायावर विचार विनिमय केला जात आहे.