जळगाव : बैलांना पाणी पाजण्यासाठी देवळी धरणावर गेलेल्या १५ वर्षाच्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. जामनेर तालुक्यातील पहूर येथे ही घटना घडली. रामेश्वर सोनवणे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तो गावातील आर. टी. लेले विद्यालयात नववीत शिकत होता. रामेश्वर हा वडिलांना मदत व्हावी, यासाठी बैलांना पाणी पाजण्याकरिता देवळी धरणावर बैलगाडी घेऊन गेला होता. तो बैल धुण्यासाठी आणि त्यांना पाणी पाजण्यासाठी बैल घेऊन पाण्याजवळ गेला. मात्र, तोल गेल्याने तो पडला. घरी एकच बैल परत आल्याने सर्वच आश्चर्यचकित झाले.
हेही वाचा >>> मनपाच्या विविध विभागांचे सेवा प्रवेश नियम मंजूर
रामेश्वर घरी न आल्याने त्यांनी धरणावर धाव घेतली. त्यांना बैलगाडीवर रामेश्वरचे कपडे ठेवलेले दिसून आले. त्यामुळे धरण परिसरात त्याचा शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही. पाण्यात शोध घेतला असता बेशुध्दावस्थेत आढळून आला. त्याला पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. तडवी यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी राजू सोनवणे यांनी दिलेल्या माहितीवरून पहूर येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. त्याच्यामागे आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.