दोन मुले असणाऱ्या महिलेशी लग्न लावून देण्यास आईने नकार दिल्याने संशयित मुलाने रागाच्या भरात घराला पेटविल्याने संसारोपयोगी सामान जळून खाक झाले. या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात संशयिताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सटाणा तालुक्यातील ठेंगोडे शिवारात बेबी पवार कुटूंबासमवेत राहतात. शनिवारी रात्री त्या घरी एकट्या असतांना त्यांचा मुलगा अंकुश दारू पिऊन आला. आईने जेवण दिल्यानंतर अंकुशने त्यांच्याशी मागील भांडणाची कुरापत काढून आवडणाऱ्या मुलीशी लग्न लावून दे, असा तगादा आईकडे लावला.
हेही वाचा >>>भुताळीण ठरविलेल्या महिलेचा अंनिसमुळे गावाकडून स्वीकार; एकमेकींना साखर भरवून शेवट गोड
आईने संबंधित महिला आपल्या जातीची नसून तिला दोन मुले असल्याने तुझे तिच्याशी लग्न लावून देणार नाही, असे सांगितले. त्यामुळे संतापलेल्या अंकुशने घर पेटवून देण्याची धमकी देत आईला मारहाण, शिवीगाळ केली. घरातील दिवा पेटलेला असतांना सिलेंडरची नळी काढून घर पेटवून दिले. आगीत शेगडी, ४०० किलो गहू, २०० किलो बाजरी, ६० किलो तांदुळ, टीव्ही, इतर संसारोपयोगी सामान खाक झाले. या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.