• इच्छुकांच्या ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची धास्ती
  • मनसेकडून पहिली यादी जाहीर
  • काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे त्रांगडे कायम

साधारणत: १० ते १२ दिवसांपूर्वी मुलाखत प्रक्रिया पार पाडणाऱ्या सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करताना अक्षरश: धाबे दणाणले आहेत.  अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशीच्या पूर्वसंध्येपर्यंत यादी जाहीर करण्याचे धारिष्टय़ भाजप, शिवसेना आदी प्रमुख पक्षांना दाखविता आले नाही. मात्र, पालिकेत सत्ताधारी राहिलेल्या मनसेने पहिली यादी जाहीर केली आहे. परिणामी, इच्छुकांच्या सहनशीलतेचा बांध फुटला असून त्याचे चटके प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांना बसण्यास सुरूवात झाली आहे. चिघळलेल्या स्थितीमुळे भाजपने यादी जाहीर न करण्याचे निश्चित करत अखेरच्या दिवशी उमेदवारांना थेट पक्षाचे अधिकृत अर्ज (एबी फॉर्म) देणार असल्याचे म्हटले आहे. तर शिवसेना आपल्या मुखपत्रातून यादी जाहीर करणार असल्याचे सांगितले जाते. जागा वाटपाचा घोळ मिटला नसल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे त्रांगडे कायम राहिले. या एकंदर स्थितीत अखेरच्या दिवशी इच्छुकांच्या ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत शुक्रवारी संपुष्टात येत आहे.  गुरूवारी सायंकाळपर्यंत मनसे वगळता एकाही राजकीय पक्षाने आपापली उमेदवारी यादी जाहीर केली नाही. राज्यात व केंद्रात सत्ताधारी असणाऱ्या भाजप व शिवसेनेत इच्छुकांची संख्या अतिशय मोठी आहे. यादी आधी जाहीर केल्यास बंडखोरीला उधाण येईल हे लक्षात घेऊन या दोन्ही पक्षांनी अखेरच्या क्षणापर्यंत आपली यादीच जाहीर केली नाही. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर पक्षीयांनी आपली यादी जाहीर करणे टाळले. या गदारोळात मनसेने प्रथम आपली यादी जाहीर करत आघाडी घेतली. इतर पक्षांची यादी जाहीर होत नसल्याने आणि अधिकृत यादीतून पत्ता कट होणार असल्याची जाणीव झाल्यानंतर अनेक ज्येष्ठ नेत्यांनी अखेरच्या क्षणी अन्य पक्षात प्रवेश करत िरगणात उतरण्याची तयारी केली आहे. अखेरच्या टप्प्यात अतिशय वेगाने या घडामोडी घडत असताना वर्षभर तयारी करत, मुलाखती देऊन यादीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या इच्छुकांची अस्वस्थता संतापात रुपांतरीत होण्यास सुरूवात झाली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ab forms issue in nashik election
First published on: 03-02-2017 at 00:29 IST