संसदेतील कामकाजाशी ओळख व्हावी या हेतूने नाशिकरोड येथील बिंदू रामराव देशमुख कला, वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला २५ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता जिल्हास्तरीय ‘अभिरूप संसद’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सहा वर्षांपासून या महाविद्यालयातर्फे ही स्पर्धा घेण्यात येते. स्पर्धेत चर्चेसाठी नेट न्यूट्रिलिटी, दुष्काळ निवारण, राष्ट्रीय युवा धोरण, कृषिमाल वायदे बाजार (लिलाव), वन्यजीव संरक्षण कायदा-वास्तव, न्यायमंडळ व कायदेमंडळ यांचा अधिकार क्षेत्राविषयक संघर्ष, दहशतवादाला धर्म नसतो, बैलगाडी शर्यती, मतदान सक्ती, राजकीय पक्ष आणि माहिती अधिकार कायदा हे विषय ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पाहुणे म्हणून माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, आ. देवयानी फरांदे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. अ. रा. भारद्वाज यांनी दिली आहे.