scorecardresearch

शेतीसाठी यंदा मुबलक पाणी; धरणसाठा ४४ टक्क्यांवर; विविध धरणांमधून उन्हाळी आवर्तन

समाधानकारक जलसाठय़ामुळे यंदा उन्हाळय़ात शेतीला पाणी देण्यास कुठलाही अडसर नसून सध्या गंगापूर, मुकणे, वालदेवी आणि दारणा धरणातून विसर्ग करण्यात आला आहे.

नाशिक : समाधानकारक जलसाठय़ामुळे यंदा उन्हाळय़ात शेतीला पाणी देण्यास कुठलाही अडसर नसून सध्या गंगापूर, मुकणे, वालदेवी आणि दारणा धरणातून विसर्ग करण्यात आला आहे. गोदावरी उजवा आणि डावा तट कालव्यासह गंगापूर, वैजापूरला जलद कालव्याद्वारे पाणी दिले जात आहे. उन्हाची तीव्रता वाढत असताना शेतीला मागणीनुसार आवर्तन दिले जात असल्याने पाटबंधारे विभागाने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या ४४ टक्के जलसाठा आहे.

उन्हाळय़ात टंचाईची तीव्रता वाढू लागली की, उपलब्ध जलसाठय़ाचे नियोजन करताना पाटबंधारे विभागाचा कस लागतो. अशावेळी पिण्यासाठी पाण्याची उपलब्धता करण्यास प्राधान्य दिले जाते. त्याचवेळी पिके वाचविण्यासाठी आवर्तन सोडण्याची मागणी होत असते. स्थानिक लोकप्रतिनिधींकडून पाणी सोडण्यासाठी दबाव येतो. कधीकधी थेट धरणावर आंदोलन होऊन शेतीला पाणी सोडण्याची मागणी झाल्याचा इतिहास आहे. या स्थितीत यंदाचे वर्ष समाधानकारक असल्याचे चित्र आहे. नाशिक पाटबंधारे विभागाच्या अहवालानुसार सध्या जिल्ह्यातील लहान मोठय़ा २४ धरणांमध्ये २८ हजार ८२० दशलक्ष घनफूट म्हणजे ४४ टक्के साठा आहे.  १८ दिवसांपूर्वी ही टक्केवारी ५३ टक्के होती. अवघ्या काही दिवसात नऊ टक्के जलसाठय़ात घट झाली आहे. त्यामागे शेतीसाठी सोडलेली आवर्तने हे कारण आहे.

सध्या नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात (५१ टक्के), काश्यपी (४८), गौतमी गोदावरी (४४), आळंदी (३५), पालखेड (३८), करंजवण (२८), वाघाड (१९), ओझरखेड (४६), पुणेगाव (२७), तिसगाव (२९), दारणा (५४), भावली (२८), मुकणे (५०), वालदेवी (४१), कडवा (२६), नांदूरमध्यमेश्वर (१००), भोजापूर (१८), चणकापूर (४४), हरणबारी (५१) केळझर (३०), नागासाक्या (सात), गिरणा (४६), पुनद (६५) टक्के असा जलसाठा आहे. माणिकपूंज हे धरण कोरडेठाक झाले आहे. गतवर्षी याच सुमारास धरणात ४३ टक्के जलसाठा होता. गंगापूर, मुकणे आणि दारणामधून विसर्ग करण्यात आला आहे.

विविध धरणांमधून शेतीसाठी उन्हाळय़ाचे आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे मागील काही दिवसात धरणसाठा कमी झाल्याचे दिसते. बाष्पी भवनाचा धरणातील जलसाठय़ावर परिणाम होतो. परंतु, नियोजनात ते गृहीत धरलेले असते. 

– अलका अहिरराव (अधिक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक)

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Abundant water agriculture dam stock summer cycles various dams ysh