या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१७ पेक्षाही अधिक अपघातात चार जणांचा मृत्यू, १४ जखमी

नाशिक : पंचवटीतील तारवालानगर चौफुली येथे पाच वर्षांतील १७ पेक्षा अधिक अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू, तर १४ जण जखमी झाले आहेत. कायम होणाऱ्या अपघातांमुळे सामाजिक संघटनांच्या मागणीवरून महापालिका प्रशासनाने वाहनांचा वेग नियंत्रणात ठेवण्यासाठी चौफुलीवर चारही बाजूने ‘हम्प’ बसवून तात्पुरती मलमपट्टी केली. परंतु, त्यानंतरही या ठिकाणी अपघात होऊन एका डॉक्टरचा मृत्यू झाला. वारंवार होणाऱ्या अपघातांवर नियंत्रणासाठी चौफुलीवर उड्डाणपूल उभारण्यात यावा, अशी मागणीे  पंचवटी युवक विकास समितीने केली आहे.

समितीचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी माहिती अधिकारात एक जानेवारी २०१५ पासून डिसेंबर २०२० या कालावधीत झालेल्या अपघातांची माहिती पोलीस प्रशासनाकडे मागितली होती. या माहितीत पाच वर्षांत दिंडोरी रस्त्यावर असलेल्या तारवालानगर चौफुलीवर १७ पेक्षा अधिक अपघात झाले असल्याचे कळविण्यात आले. त्यामध्ये चार जणांचा मृत्यू, तर १४ जण जखमी झाले असल्याची नोंद पंचवटी पोलीस ठाण्यात आले. नोंद नसलेले देखील अनेक छोटे अपघात याठिकाणी झालेले आहेत. या अपघातांमध्ये सामील वाहनात शहर बस, रिक्षा, मालवाहतूक गाडय़ा, कार, मोटरसायकल यांचा समावेश आहे. या ठिकाणी अपघातांची संख्या कमी व्हावी, म्हणून अनेक सामाजिक संघटनांनी पाठपुरावा केला. त्यामुळे मनपा प्रशासनाने वाहनांचा वेग नियंत्रणात आणण्यासाठी चौफुलीवर चारही बाजूने हम्प बसवून तात्पुरती मलमपट्टी केली. परंतु, वाहनधारक हम्पचा अडथळा न जुमानता भरधाव वाहने चालवित असल्याने हम्पनंतरही अपघात होऊन एका डॉक्टरचा मृत्यू झाला आहे.

राष्ट्रीय महामार्ग असल्याने या मार्गावर वाहतुकीची कायम वर्दळ असते. अमृतधाम ते हनुमानवाडी रस्ता चौफुली भेदून पुढे गंगापूर रस्त्याला जोडला गेला आहे. या रस्त्याने सतत वाहतूक असते. शिवाय दिंडोरी रस्त्यावर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती असल्यामुळे शेतकरी आणि माल वाहतूक वाहनांची देखील कायम वर्दळ असते. मेरीचे प्रशासकीय कार्यालय, सिडीओ मेरी शाळा, काकासाहेब देवधर शाळा आणि महाविद्यालय, आरोग्य विद्यापीठ, महावीर महाविद्यालय, म्हसरूळ येथील गावठाण वसाहत शिवाय नव्याने विकसित झालेल्या नववसाहतींमुळे मार्गावर कायम वाहतूक सुरू  असते.

पंचवटी युवक विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत राऊत, कार्याध्यक्ष किरण पानकर, उपाध्यक्ष धनंजय कोठुळे, सरचिटणीस सचिन दप्तरे, खजिनदार अजित पाटील आदींनी केली आहे.

 

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident news tarwalangar flyover bridge akp
First published on: 13-02-2020 at 00:23 IST