नाशिक : १० डिसेंबर २०२० ते ६ एप्रिल २०२१ या कालावधीत मालेगाव तालुक्यातील १९ शेतकऱ्यांचा अपघातात मृत्यू झाला. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत त्यांच्या कुटुंबीयांना उभारी देण्यासाठी विमा दाव्याची रक्कम प्रत्येकी रुपये दोन लाख याप्रमाणे ३७ लाख रुपये आरटीजीएसमार्फत निधन झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांच्या खात्यावर वितरित करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.
मालेगाव तालुक्यातील टेहरे, पाटणे, आघार खुर्द, चिंचावड, नांदगाव बुद्रुक, सौंदाणे, वाके आणि मुंगसे या गावात शासनाच्या विविध योजनांची माहिती गाव पातळीवर पोहचविण्यासाठी भुसे यांचा गावनिहाय दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अरिवद महाजन, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तहसीलदार चंद्रजित राजपूत, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे आदी उपस्थित होते. यावेळी भुसे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत खंडित कालावधी १० डिसेंबर २०२० ते ६ एप्रिल २०२१ या कालावधीत महाराष्ट्रातील एक हजार ७४५ शेतकऱ्यांचे अपघातात निधन झाले. अथवा अपंगत्व प्राप्त झाले, पहिल्या टप्प्यात पात्र शेतकऱ्यांच्या वारसांना शासनाच्या वतीने विशेष बाब म्हणून विमा दाव्याची रक्कम रुपये ३४ कोटी ७३ लाख वितरित करण्यात आली असल्याचेही भुसे यांनी यावेळी सांगितले. मालेगाव तालुक्यातील १९ शेतकऱ्यांचे निधन झालेल्या वारसांच्या खात्यात रुपये दोन लाख जमा केल्याचे प्रमाणपत्र भुसे यांच्या हस्ते देण्यात आले.
शेतकरी महिलांनी आपले नाव लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत सात-बारा उतारावर लावून कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही भुसे यांनी केले. यावेळी गावातील आरोग्य, कृषी, रस्ते, वीज, नदी जोड प्रकल्प पूर्ण करणे, घरकुल योजना, रोहित्र बदलणे, ग्रामीण पाणीपुरवठय़ाची कामे पूर्ण करणे आदी समस्यांबाबत गावकऱ्यांनी मंत्र्यांशी संवाद साधून सविस्तर चर्चा केली. या समस्यांचे तात्काळ निराकरण करण्याचे यावे, अशा सूचना संबंधित विभागांना भुसे यांनी दिल्या. प्रत्येक गावात कृषी कार्यालयाने महाडीबीटीमार्फत निवड झालेल्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून कागदपत्रे अपलोड करण्याबाबत मार्गदर्शन करण्यास भुसे यांनी सांगितले. मालेगाव तालुक्याचा नानाजी देशमख संजीवनी प्रकल्प योजनेत सहभाग झाल्याने या योजनाचा लाभ येणाऱ्या काळात लवकरच होणार आहे. ज्या लाभार्थ्यांची निवड संजय गांधी निराधार योजनेमध्ये झाली आहे, त्यांचे हयातीचे दाखले प्राप्त करून तहसीलदार यांना सादर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.