वीज चोरीचा गुन्हा नोंदविण्याची धमकी देऊन १५ हजार रुपयांची लाच मागितल्यावरून गुरुवारी महावितरणच्या मालेगाव तालुक्यातील दहीवळ येथील वीज कर्मचारी राकेश रमेश लोंढे याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला.
मालेगाव येथील सायतरपाडे शिवारात तक्रारदाराने विहिरीवर पाणी उपसा करण्यासाठी इलेक्ट्रिक मोटार लावली होती. लोंढेने ती काढत केबल जप्त केली. तक्रारदाराने केबल मागितली असता त्यांच्यावर तुम्ही वीज चोरता असा आरोप करत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची धमकी दिली. गुन्हा नोंदवू नये यासाठी १५ हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. तक्रारदाराने या बाबतची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागास कळविली. दरम्यानच्या काळात लोंढेला तक्रारदाराने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीन वेळा सापळा रचला. मात्र लोंढेची भेट झाली नाही. मागील भेटीत त्याने रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे लोंढेने लाचेची मागणी केल्याचा सबळ पुरावा तक्रारदार व विभागाकडे नव्हता. मात्र नुकताच या संदर्भातील पुरावा प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लोंढेवर गुन्हा दाखल केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action against corrupt electricity employees
First published on: 29-04-2016 at 01:14 IST