लक्ष्मी पूजनच्या दिवशी फटाके विक्रीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन शहरातील वेगवेगळ्या भागात अनधिकृतपणे फटाके विक्री करणाऱ्यािंवरुध्द पोलीस यंत्रणेने कारवाई केली. काही वर्षांपूर्वी धोकादायक पध्दतीने केलेल्या स्फोटक पदार्थाच्या साठा पंचवटीतील तारवालानगर येथे मोठय़ा दुर्घटनेस कारक ठरला होता. या पाश्र्वभूमीवर, सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उपाय न करता बेकायदेशीरपणे फटाके विक्री करणाऱ्यांवर पोलीस यंत्रणेने लक्ष केंद्रीत केले आहे.
साधारणत: साडे तीन वर्षांपूर्वी पंचवटीतील तारवालानगर भागात एका गाळ्यात अनधिकृतपणे या स्वरुपाच्या पदार्थाचा साठा करण्यात आला होता. फटाके वा तत्सम पदार्थाची विक्री वा साठा करावयाचा असल्यास अग्निशमन दलासह विविध शासकीय यंत्रणांची परवानगी घेणे क्रमप्राप्त ठरते. उपरोक्त घटनेत त्या पदार्थाचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली. इमारतीचा बहुतांश भाग जमीनदोस्त झाला. रहिवासी अक्षरश: रस्त्यावर आले. तेव्हापासून फटाके वा तत्सम पदार्थाचा निवासी भागात साठा होऊ नये यासाठी दक्षता घेतली जात आहे. शहरात फटाके विक्रीसाठी काही ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे. त्या ठिकाणी आवश्यक तो परवाना घेऊन फटाके विक्री केली जाते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अग्निशमन दलाचा बंबही या ठिकाणी कार्यरत असतो.
या घडामोडीत काही निवासी भागात त्याची अनधिकृतपणे विक्री केली जात असल्याचे आढळून आले. काठे गल्लीतील बरखा बहार इमारत आणि नेहरू उद्यानाजवळ अशा दोन ठिकाणी या प्रकारे फटाके विक्री सुरू सुरू होती. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना न करता बेकायदेशीरपणे फटाके विक्री करणाऱ्या दोन जणांविरुध्द भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.