कृषी विभागाचा इशारा

नाशिक : रासायनिक खतांच्या गोणीवरील छापील किमतीपेक्षा कुणी जास्त किमतीने खत विक्री करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा इशारा कृषी विभागाने दिला आहे.

केंद्र शासनाच्या एनबीएस धोरणानुसार युरिया खत वगळता इतर रासायनिक खतांचे दर ठरविण्याचा अधिकार त्या त्या रासायनिक खत उत्पादक कंपनीस आहे. कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाली असा दाखला देत काही रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी डीएपी, एमओपी, एसएसपी व संयुक्त खते या खतांच्या किमतीत वाढ केली आहे. सद्य:स्थितीत बाजारात जुन्या दराची खतेसुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळे रासायनिक खतांच्या गोणीवर छापलेल्या किमती तपासून त्याप्रमाणेच रक्कम देऊन शेतकरी बांधवांनी खते खरेदी करावीत, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

छपाई किमतीपेक्षा जादा किंमत आकारता येत नाही. रासायनिक खतांच्या काही ग्रेडच्या किमती वाढल्या असल्या तरी जुन्या दराची खते (जुने दर छपाई असलेल्या बॅगा) जुन्याच दराने शेतकऱ्यांना विकणे बंधनकारक आहे. तसेच शेतकऱ्यांना पावती देणे बंधनकारक आहे. कृषी विभागाने तसे निर्देश खत विक्रेत्यांना दिले आहेत. कुणी विक्रेता जुन्या दरातील खत वाढीव किंमत आकारून विकत असल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रार करावी अथवा जिल्हा सनियंत्रण कक्ष (जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक ९४२३७ २६३२४, मोहीम अधिकारी ९८३४३ ७३८६१) यांच्याकडे तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.