४० लाखांचा दंड होण्याची शक्यता
नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील वाळू तस्कर तापी नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा करून चोरटी वाहतूक करत आहेत. या वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी सटाणा-ताहाराबाद रस्त्यावर सापळा रचून तब्बल ३७ वाळूचे डंपर पकडण्यात आले. सटाणा तहसील आणि जायखेडा पोलीस यांनी ही संयुक्त कारवाई केली. पकडलेल्या वाहनधारकांकडून ३५ ते ४० लाख रुपये दंड वसूल होण्याची शक्यता आहे.या बाबतची माहिती तहसीलदार सुनील सौंदाणे यांनी दिली. आतापर्यंत जिल्ह्यतील सर्वात मोठी कारवाई असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बनावट परवाने छापून तसेच क्षमतेपेक्षा अधिक वाळू भरून तापी नदी पात्रातून मोठय़ा प्रमाणात वाळूची चोरी केली जात आहे. ही वाळू नाशिक, मुंबईकडे चढय़ा भावाने विक्री करण्याचे मोठे जाळे नंदुरबार, नाशिक जिल्ह्यात कार्यरत आहे. या धंद्याला राजकीय वरदहस्तदेखील आहे. हा धंदा गेल्या काही दिवसांपासून अधिक जोमाने सुरू असल्याने वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रांत प्रवीण महाजन, तहसीलदार सुनील सौंदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सायंकाळी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, विनोद चव्हाण, जायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या विशेष पथकाने सटाणा-ताहाराबाद रस्त्यावरील करंजाडजवळ सापळा रचण्यात आला.
या वेळी वाळूने भरलेल्या ३७ डंपरचा ताफा एका हॉटेलच्या मैदानावर थांबल्यावर पथकाने छापा टाकला. या वेळी एक डंपर चालकाने पळवून नेला. संबंधित चालक आणि मालकाविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या पथकाने उर्वरित वाळूचे डंपर सटाणा तहसील आवारात जमा करून अधिकृत परवान्याची तापसणी केली. या वेळी चार वाहनांकडे नंदुरबार प्रांताधिकाऱ्यांचे परवाने आढळून आले. मात्र हे परवाने खरे आहेत का, याच्या पडताळणीचे काम सुरू असून वाळू साठय़ाचा पंचनामा करण्यात आला.
गेल्या सहा महिन्यांपूर्वी विनापरवाना वाहतूक करणारे अकरा वाळूचे डंपर पकडले होते. त्याच्यानंतर एकत्रितपणे ३७ डंपर पकडून मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.
२७ डंपरचालकांचे पलायन
नंदुरबार येथे साठा केलेल्या वाळूची वाहतूक करण्यासाठी शासनाने १३ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत परवानगी दिल्याचा दावा एका वाळू ठेकेदाराने केला आहे. महसूल यंत्रणेची कारवाई सुरू असताना तब्बल २७ वाळूच्या डंपरवरील चालकपरवाने न दाखवता वाहने सोडून पळून गेल्याचे तहसीलदार सौंदाणे यांनी सांगितले. दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना पाचारण करून प्रत्येक डंपरमध्ये किती वाळूसाठा आहे, याबाबत तपासणी करून पंचनामे करण्याचे काम सुरू होते. या कारवाईत शासनाच्या नियमानुसार वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक वाळूसाठा आणि विनापरवाना वाळू वाहतूक यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून ३५ ते ४० लाख रुपयाचा दंड वसूली अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले.