आस्थापनांना पाच हजार तर नागरिकांना एक हजार रुपये दंड

नाशिक : शिथिलीकरणात बरचेसे निर्बंध हटल्याने नागरिकांना करोना नियमावलीचा विसर पडला आहे. सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा, लग्न सोहळे, प्रार्थना स्थळे अशा अनेक ठिकाणी अनेक जण मुखपट्टीविना वावरताना दिसत आहेत. या पार्श्र्वभूमीवर वर जिल्हा प्रशासनाने करोना नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांना पाच हजार तर ग्राहक अर्थात नागरिकांना एक हजार रुपये दंडात्मक कारवाईचे निर्देश दिले आहेत.

एखादी आस्थापना सलग दुसऱ्यांदा नियमांचे भंग करताना आढळल्यास करोनाची अधिसूचना रद्द होईपर्यंत ती बंद ठेवली जाणार आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात आले. मंदिरे भाविकांसाठी खुली झाली.

आस्थापना, बाजारपेठा पूर्ववत होऊन जनजीवन पूर्वपदावर येत आहे. या घटनाक्रमात अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसविले जात असल्याचे दिसत आहे. विवाह सोहळय़ात गर्दी होत आहे. प्रार्थना स्थळ, धार्मिक स्थळी ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व गरोदर स्त्रिया ज्यांचे प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झालेले आहे, त्यांना भेट देण्याची मुभा आहे.

लग्न सोहळा, प्रार्थना स्थळ, मंदिरांसह सार्वजनिक ठिकाणे, आस्थापना अशा ठिकाणी नियमावलीचे पालन होत नाही. कारवाई थंडावल्याने नियम भंग करणारे नागरिक मुक्तपणे संचार करत आहेत. जिल्ह्यात बुधवारी करोनाचे ५१ नवीन रुग्ण आढळले. त्यात नाशिक महापालिका क्षेत्रातील २७ तर ग्रामीणमधील २३ व जिल्हाबाह्य एकाचा समावेश आहे. करोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे निर्देश दिले आहेत.

सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टीविना कुणी आढळल्यास संबंधितास एक हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. ज्या आस्थापनांकडून करोना नियमांचे पालन होत नाही, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. कुठल्याही नियमांचे उल्लंघन झाल्यास आस्थापना चालकास पाच हजार रुपये, तिथे उपस्थित ग्राहकांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. एखाद्या आस्थापनेकडून दुसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन झाल्यास ती आस्थापना करोनाची अधिसूचना रद्द होईपर्यंत बंद ठेवली जाणार असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे.

कारवाईअभावी धाक ओसरला

प्रशासनाने दंडात्मक कारवाईची अधिसूचना काढली असली तरी मागील तीन, चार महिन्यात महापालिका प्रशासनाची कारवाई थंडावलेली आहे. ग्रामीण भागातील लहान-मोठय़ा शहरात वेगळे चित्र नाही. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गर्दी असते. सुरक्षित अंतर, मुखपट्टीचे नियमही अनेक जण पाळत नाही. लग्न सोहळय़ांमध्ये गर्दी उसळत आहे. नियमित कारवाई झाल्यास धाक बसतो. नागरिक नियमांचे पालन करू लागतात. हा धाक सध्या नाहीसा झाला आहे. नव्या अधिसूचनेनंतर यंत्रणांनी कारवाईचा बडगा न उगारल्यास परिस्थितीत फारसा बदल होणार नसल्याची भावना सामान्यांकडून व्यक्त होत आहे.