कृषिमाल वाहनांना पोलीस बंदोबस्त देण्याची तयारी

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पाश्र्वभूमीवर, गुरुवारपासून बाजार समितीचे कामकाज सुरळीतपणे सुरू ठेवणे, कृषिमालाची वाहतूक करणारी वाहने रोखण्याच्या प्रकारांना प्रतिबंध करणे आणि गरज भासल्यास बाहेरगावी भाजीपाला व तत्सम माल घेऊन निघालेल्या वाहनांना एकत्रित स्वरुपात पोलीस बंदोबस्त देण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. बाजार समित्यांनी कामकाज सुरू ठेवण्याची तयारी दर्शविली असली तरी या समित्यांचे नेतृत्व ज्यांच्याकडे आहे, त्या घटकांनी पडद्यामागून संपाला पाठिंबा दिला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचे किती व कसे परिणाम होतील, याबद्दल प्रशासकीय यंत्रणा साशंक आहे. संपात जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची जय्यत तयारी केली आहे.  त्यातही ग्रामीण भागात सर्वदूर विखुरलेला शेतकरी हा घटक असल्याने त्यावर नियंत्रण मिळविणे वा त्याला कृषिमाल विक्रीसाठी तयार करणे हे देखील प्रशासनासमोरील आव्हान आहे. जिल्हा प्रशासनाने सहकार विभाग व पोलीस यंत्रणेशी चर्चा करीत कृषिमालाचे व्यवहार सुरळीतपणे सुरू राहतील या दृष्टीने दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पिंपळगाव बसवंतचा अपवाद वगळता अन्य बाजार समित्यांनी आपले व्यवहार सुरू राहणार असल्याचे म्हटले आहे.

आजवर व्यापारी, माथाडी कामगार आदींनी पत्र दिल्यावर बाजार समितीचे कामकाज बंद ठेवले जाते. जिल्’ाातील सर्व बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांनी प्रथमच निवेदन व पत्र देऊन समित्या बंद ठेवण्याची मागणी केली आहे. यामुळे पिंपळगाव बसवंत बाजार समिती बंद राहणार असल्याचे सभापती दिलीप बनकर यांनी सांगितले. यामुळे उद्भवणारी स्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने सहकार विभागामार्फत सर्व बाजार समित्यांमध्ये कृषिमाल लिलावाचे कामकाज होईल याकडे लक्ष दिले आहे.

लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर आणि नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरुण काळे यांनी गुरूवारी बाजार समितीचे कामकाज सुरू राहणार असल्याचे म्हटले आहे. लासलगाव ही कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. शेतकऱ्यांनी कांदा विक्रीला आणला नाही तर लिलाव होऊ शकणार नाही. त्यामुळे बाजार समितीचे केवळ प्रशासकीय कामकाज होईल, असे होळकर यांनी सांगितले. नाशिक बाजार समितीत काही शेतकऱ्यांनी कृषिमाल आणण्याची तयारी व्यापाऱ्यांकडे दर्शविली आहे. त्यामुळे भाजीपाल्याची आवक होऊन लिलावही होणार असल्याचे समितीकडून सांगण्यात आले. जिल्’ाातील बहुतांश बाजार समित्या खुल्या राहणार असल्या तरी प्रत्यक्षात किती शेतकरी माल आणतात यावर लिलावाची भिस्त अवलंबून आहे.

पोलीस यंत्रणेला सूचना

जिल्हा उपनिबंधकांनी जिल्’ाातील सर्व बाजार समिती सचिवांची बैठक घेतली आहे. संप काळात जिल्’ाातील सर्व बाजार समित्यांचे कामकाज सुरू राहणार असल्याचे सचिवांकडून सांगण्यात आले. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये नेहमीप्रमाणे कृषिमालाची आवक व लिलावाचे काम होईल. शेतकरी संपात सहभागी झालेले घटक असंघटित आहे. त्यांच्याकडून महामार्गावर कृषिमालाची वाहने रोखण्याचा इशारा दिला गेला आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेलाही असे प्रकार घडणार नाहीत याची दक्षता घेण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच बाजार समितीतून बाहेरगावी कृषिमाल नेणाऱ्या मालमोटारी गरज भासल्यास एकत्रित पोलीस बंदोबस्तात सोडण्याचे नियोजन आहे.

रामदास खेडकर  (निवासी उपजिल्हाधिकारी)

 

कांद्याचा लगेच तुटवडा भासणार नाही

शेतकऱ्यांनी कृषिमाल बाजारात आणला नाही तर लिलाव कसा होणार ? संप सुरू झाल्यावर भाजीपाल्यासारखा कांद्याचा लगेच तुटवडा भासणार नाही. प्रत्येकाच्या घरात काही दिवस पुरेल इतका कांदा साठविलेला असतो. त्यामुळे काही दिवस कांद्याची टंचाई भासणार नाही. हा कालावधी आठ दिवसांहून अधिक झाल्यास कांद्याची टंचाई भेडसावू शकते. यापूर्वी बाजारातून खरेदी केलेला कांदा व्यापारी वर्गाकडे साठविलेला आहे. तो विक्री करता येईल की नाही, याबद्दल लगेच काही सांगता येणार नाही.

सोहनलाल भंडारी (अध्यक्ष, लासलगाव व्यापारी संघटना)

 

बाजार समित्या सुरू राहणार

जिल्’ाातील १५ बाजार समित्यांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. सर्व बाजार समित्यांकडून या संदर्भात माहिती घेण्यात आली. संबंधितांनी आपले व्यवहार सुरू राहणार असल्याचे सांगितले आहे.

निळकंठ करे (जिल्हा उपनिबंधक, सहकार विभाग)