जळगाव : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे ऑनलाइन रमी खेळतानाची चित्रफीत व्हायरल झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. विरोधकांनीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर, मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या अजित पवार गटातील काही आमदारांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. त्यातीलच एका आमदाराने “ज्या दिवशी पत्र हातात येईल, तोच दिवस खरा…”, असे सांगून आपण त्या आशेवर अजुनही बसल्याची थेट कबुली दिली आहे.
वादग्रस्त विधानांमुळे आधीच चर्चेत असलेले राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहाचे कामकाज चालू असताना भ्रमणध्वनीवर रमी खेळत असल्याची चित्रफीत सध्या सगळीकडे गाजत आहे. विरोधकांनी त्यानंतर कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली. दरम्यान, कोकाटे यांनी पक्षादेश मानून मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यास अजित पवार गटाकडून कृषी खाते दुसरे कोणाकडे सोपविले जाते की पक्षाच्या इतर आमदाराला मंत्रिपदाची संधी मिळते, त्याविषयी आता चर्चा सुरू झाल्या आहेत. कोकाटे यांच्यावर गंडांतर आल्यास अजित पवार गटाकडून ज्या कोणत्या आमदाराला मंत्रिपदाची संधी मिळू शकते, त्यात अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांचेही नाव अग्रस्थानी असल्याचे बोलले जात आहे.
आमदार पाटील हे अजित पवार यांचे विश्वासू आणि पहिल्या फळीतील नेते मानले जातात. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार असतानाही त्यांनी अजित पवार यांना साथ दिली होती. ज्यामुळे त्यांना एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मदत व पुनर्वसन खाते मिळाले होते. दरम्यान, अमळनेरमधून दुसऱ्यांदा निवडून आल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा मंत्री होण्याची संधी अनिल पाटील यांना मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी सत्ता स्थापनेनंतर सुरक्षा व्यवस्था नाकारून जाहीर नाराजी देखील व्यक्त केली होती. तशात काही दिवसांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या वाट्याला पुन्हा मंत्रिपद येण्याची शक्यता व्यक्त होत असताना, प्रत्यक्षात छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिपदाने दोनवेळा हुलकावणी दिल्याने पाटील यांचा मोठा हिरमोड परिणामी झाला होता.
असे असताना, मंत्रिपदाकडे इतक्या दिवसांपासून आस लावून बसलेल्या आमदार अनिल पाटील यांच्या गळ्यात माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर यावेळी मंत्रिपदाची माळ नक्की पडणार, अशा आशयाचे स्टेटस त्यांचे अमळनेरमधील समर्थक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आता ठेवले आहेत. वैयक्तिक आमदार पाटील यांनी आपण सुद्धा तशा चर्चा टीव्हीवर आणि इतर माध्यमातून ऐकत असल्याचे सांगितले. माझी अजून पक्षात कोणाशी त्या विषयावर चर्चा झालेली नाही. मंत्रिपदासाठी दावेदार वगैरे कोणी नसते. पक्षश्रेष्ठी ठरवितात, तसेच होत असते. तो दिवस येईल तोच खरा, अशीही भावना पाटील त्यांनी व्यक्त केली.