जळगाव : जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात अनेक दिग्गजांनी एका पाठोपाठ प्रवेश केल्याने राष्ट्रवादीची (अजित पवार) ताकद वाढली आहे. दरम्यान, पक्षाचे अमळनेरमधील एकमेव आमदार अनिल पाटील यांच्यासह काँग्रेसमधून नुकत्याच दाखल आलेल्या प्रतिभा शिंदे यांना प्रदेश प्रवक्ता पदाचे बळ देण्यात आले आहे. इतर दिग्गज मात्र अजुनही संधी मिळण्याच्या प्रतिक्षेतच बसले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने तब्बल १७ प्रदेश प्रवक्त्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. ज्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील अमळनेरचे आमदार अनिल पाटील आणि अलिकडेच काँग्रेसमधून अजित पवार गटात दाखल झालेल्या प्रतिभा शिंदे यांचाही समावेश केला आहे. आमदार पाटील हे यापूर्वीही अजित पवार गटाचे तर शिंदे या काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा होत्या.
त्यामुळे दोघांचा पक्ष संघटन कार्यातील मोठा अनुभव आणि वक्तृत्व लक्षात घेऊन अजित पवार गटाने त्यांची प्रदेश प्रवक्ता पदावर आता थेट नियुक्ती केली आहे. पक्षाची भूमिका मांडण्याची मोठी जबाबदारी टाकून वैयक्तिक पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी दोघांवर मोठा विश्वास व्यक्त केला आहे.
माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर तसेच माजी आमदार कैलास पाटील, दिलीप सोनवणे आदींनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून अजित पवार गटात प्रतिभा शिंदे यांच्या आधीच प्रवेश केला आहे. तेव्हापासून संबंधितांनी पक्ष कार्यालयात वाहून घेतल्याचे दिसून येत आहे. वैयक्तिक प्रभावाच्या जोरावर आपापल्या मतदारसंघात पक्ष बळकटीसाठी जोरदार प्रयत्नही केले आहेत. मात्र, पक्ष नेतृत्वाकडून त्यांच्या कार्याची अद्याप म्हणावी तशी दखल घेतली गेलेली नाही. पक्ष संघटनेत तसेच महामंडळांवरील मोठी जबाबदारी सुद्धा त्यांच्याकडे सोपविण्यात आलेली नाही. त्या तुलनेत पक्षात नुकत्याच दाखल झालेल्या प्रतिभा शिंदे यांना लागलीच मोठी जबाबदारी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे.
अरूण गुजराथी यांचाही प्रवेश
जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजल्यानंतर भाजपसह शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्या बरोबर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातही प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूण गुजराथी हे देखील अजित पवार गटात मुंबईत मंगळवारी प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मंत्री माणिकराव कोकाटे यांनी त्यास दुजोरा दिला आहे. माजी मंत्री देवकर, डॉ. पाटील यांच्यासह इतर माजी आमदारांनी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिली, त्यावेळीच गुजराथी हे पक्ष सोडणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मला आजवर भरपूर दिले आहे. त्यामुळे त्यांना सोडून जाण्याचा किंवा दुसऱ्या कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्न येत नाही. आता मी सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते कोणत्याही पक्षात असले तरी, मी फक्त मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहणार असल्याचे गुजराथी यांनी स्पष्ट केले होते.
