दरडी कोसळणारी ३५ ठिकाणे निश्चित, नियंत्रण कक्षाची स्थापना

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येत्या पावसाळ्यात नाशिक जिल्ह्य़ातील संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. जिल्ह्य़ातील चार हजार किलोमीटरच्या रस्त्यांवर पावसाळ्यात दरडी कोसळू शकतात अशी ३५ ठिकाणे निश्चित करण्यात आली असून पाण्याखाली जातील अशा तीस पुलांचीही यादी तयार करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या संदर्भातील आपला अहवाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सादर केला आहे.

दरडी कोसळू शकतील अशा ठिकाणांमध्ये प्रामुख्याने कळवण, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर तालुक्यांचा समावेश आहे. तर पावसामुळे पूर आल्यास ३० पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी सहा पूल वाहतुकीसाठी बंद करावे लागले होते. त्यापैकी एकाचा अपवाद वगळता तीन पुलांची दुरुस्ती करण्यात आली असून दोन पुलांची नव्याने बांधणी केली जात आहे. पावसाळ्यात नुकसान होऊन पूल पडणे, रस्त्याचा भराव वाहून जाणे, झाड पडणे, अपघातामुळे होणारी वाहतूक कोंडी, दरडी कोसळणे, रस्त्यांवर मोठे खड्डे पडणे, इमारत पडणे अशी आपत्ती उद्भवू शकते. संभाव्य आपत्तींना तोंड देण्यासाठी बांधकाम विभागाने नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. एखाद्या मार्गावरील वाहतूक काही कारणास्तव विस्कळीत झाल्यास पर्यायी मार्गांचा अभ्यास करण्यात आला आहे.

२०१६-१७ मध्ये ओझर-सायखेडा-पांचाळे-वावी मार्गावरील चांदोरी-सायखेडा गावास जोडणारा पूल, डुबेरे-सोनारी-शिवडे-पांढुर्ली-भगूर रस्त्यावरील पूल, घोटी-सिन्नर रस्त्यावरील घोटीलगतचा पूल, सौंदाणे-कळवण-बोरगाव-सुरगाणा मार्गावरील दोन पूल, साक्री-कळवण-मालेगाव-मनमाड-येवला रस्त्यावरील मनमाडलगतचा पूल हे सहा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. नंतर त्यांची दुरुस्ती केली गेली. गेल्या वर्षी मनमाडलगतच्या पुलाच्या बाजूला समांतर नवीन पुलाचे काम पूर्ण झाले. सौंदाणे-कळवण-बोरगाव-सुरगाणा मार्गावरील दोन पुलांची नव्याने बांधणी सुरू असून तिथे पर्यायी मार्ग उपलब्ध असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता आर. आर. हांडे यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील मार्गावर नऊ ब्रिटिशकालीन पूल आहेत. त्यातील आठ पूल सुस्थितीत असून बाऱ्हे- ननाशी-गोळशी-आबेकर-घोडेगाव मार्गावरील ब्रिटीशकालीन पूल वाहतुकीसाठी कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे. तेथील वाहतूक समांतर नव्या पुलावरून होत आहे. मालेगाव-मनमाड-येवला रस्त्यावरील पांझण नदीवरील पूल दुरुस्तीचे काम सुरू आहे. यामुळे तो सध्या वाहतुकीस बंद आहे. उर्वरित प्रकाशा-छडवेल-सामोडा-सावळी विहीर रस्त्यावरील गिरणा, खडकी, वाघाडी पूर्व नदीवरील तीन पूल, मालेगाव शहरातून जाणाऱ्या जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील पूल, नाशिक बाह्य़ वळण रस्त्यावरील पूल, चांदवड-लासलगाव-विंचूर, सावळीविहीर रस्त्यावरील पूल वाहतुकीसाठी सुस्थितीत असल्याचे हांडे म्हणाले.

वारंवार दरडी कोसळणारी ठिकाणे

सप्तशृंगी गड-नांदुरी, अभोणा- कनाशी रस्त्यावरील नांदुरी घाट, बाबापूर मरकड घाट, आंबे घाट, झरी घाट, वडपाडा घाट, तांदळाची बारी, देवगाव घाट, दोनवडे घाट, घोटविहीर, वाघ्याची बारी, आमलोन घाट, पेठ-तोरंगण-हरसूल-वाघेरा-अंबोली रस्त्यावरील काही ठिकाणे, हरणबारी घाट, चिवटी बारी, मानूर घाट, वाघंबा घाट, अर्जुन धरणाच्या उजव्या बाजूकडील बंधारपाडालगतचा घाट, मानूर गावाजवळील घाट, कुत्तरबारी घाट, जायबारी, कांचणबारी, मांगबारी घाट आदी ३५ ठिकाणे वारंवार दरडी कोसळणाऱ्या यादीत आहेत.

पाण्याखाली जाणारे पूल

दिंडोरी तालुक्यातील शिंदवड गावालगतचा मोरी पूल, खडकी गावाजवळील फरशी पूल, करंजाळी-हरसूल रस्त्यावरील पूल, चिराई बुबळी, धुरापाडा, राक्षस भुवन ते गुजरातच्या हद्दीपर्यंतच्या रस्त्यावरील पूल, आडगाव-गिरणारे-वाघेरा-ओझरखेड रस्त्यावरील पूल, मनमाड-निमगाव ज्वार्डी रस्त्यावरील पूल, सटाणा-मालेगाव रस्त्यावरील मुंजवाड, करसाणे-मुल्हेर रस्त्यावरील कंधाणा, सटाणा-जायखेडा रस्त्यावरील नाल्यावरील पूल, प्रकाशा-छडवेल-सामोडा रस्त्यावरील कान नदीवरील पूल, नामपूर-मालेगाव रस्त्यावरील काकडगांव पूल, नांदुरी-मानूर-अलियाबाद रस्त्यावरील मोसम नदीवरील पूल

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All preparedness to avoid disaster
First published on: 13-06-2019 at 01:03 IST