तब्बल २० वर्षांनंतर भंगार बाजारातील अतिक्रमित दुकानांवर महानगरपालिकेचा हातोडा पडला. आज सकाळी ९ वाजे दरम्यान अंबड-सातपूर लिंकरोडवरील अतिक्रमित भंगारांची दुकाने हटविण्यास सुरवात झाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमित दुकान हटवण्यास अखेर सुरुवात झाली. ही प्रक्रिया अतिशय शांततापूर्ण चालल्याचे सध्याचे तेथील चित्र आहे. काही दुकानधारकांनी स्व:तहून अतिक्रमण काढून घेतले. चुंचाळे भागात अंदाजे २००० च्या आसपास अतिक्रमित भंगार दुकाने आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, पंजाब, गुजरात, राजस्थान तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातील व्यावसायीकांनी आपली दुकाने थाटली होती. जवळपास २० हजार पेक्षा अधिक कामगार येथे काम करत होते.

सकाळपासून येथे महानगर पालिकेचे कर्मचारी तसेच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. अंबड-लिंक रोडवर दोन्ही बाजूने बॅरीगेडस लावून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मोठ्या प्रमाणावर पोलीस फौज फाटा असल्याने परिसरास छावणीचे स्वरूप निर्माण झाले. जेसीबी, बुलडोजर, कंटेनर, अग्निशामक दलाची वाहने, ट्रक, टेम्पो यांच्या मदतीने ही मोहीम सुरु आहे.  अतिक्रमित दुकांनांची संख्या येथे जास्त असल्याने ही कारेवाई सात दिवस चालणार आहे. पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी येथे लक्ष ठेवून आहेत. या मोहीमेचे ड्रोन कॅमेरासह चित्रण करण्यात येत असून नाशिक मधील आतापर्यंतची ही सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई आहे.