धुळे : जिल्ह्यातील शिरपूर, दोंडाईचा, शिंदखेडा आणि पिंपळनेर या चार ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नामांकनपत्र भरण्यास प्रत्यक्षात आजपासून सुरुवात झाली. याचवेळी धुळे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम उद्या मंगळवार (दि. ११ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजेला शहरातील शाहू महाराज नाट्यगृह येथे होणार आहे.

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, कंसात सदस्य संख्या, एकूण मतदार आणि नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची स्थिती अशी – पिंपळनेर नगर परिषद (२०) २०, ८०० नगराध्यक्षपद एसटी महिलेसाठी राखीव. शिरपूर नगर परिषद – (३२) ६५, ७८९ नगराध्यक्षपद ओबीसी राखीव. दोंडाईचा नगर परिषद – (२६) ४८, ७८६ नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव. शिंदखेडा नगरपंचायत (१७) २२, ७१७ नगराध्यक्षपद सर्वसाधारण राखीव. या सर्व स्थानिका स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने आजपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

दरम्यान, धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीलाही वेग आला असून यानिमित्ताने उद्या आरक्षण सोडत निश्चित करण्यात आली आहे. धुळे शहरात चार लाख ३५ हजाराहून अधिक मतदार नोंदणीकृत आहेत, यातील सुमारेत ३७ हजार २२८ मतदार अनुसूचित जाती प्रवर्गातील तर २७ हजार ६८९ मतदार अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत. या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. आरक्षण समितीची सर्व तयारी पूर्ण झाली असून पारदर्शकपणे निवडणूक कार्यक्रम पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. संबंधित नागरिकांनी व इच्छुकांनी आरक्षण सोडत कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग घ्यावा असे आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.

आरक्षण निश्चित झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या उमेदवारी प्रक्रियेला खऱ्यार्थाने वेग येणार आहे. आरक्षण सोडतीनंतरच स्थानिक पातळीवर संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित होण्यास सुरुवात होईल. विशेषतः मागासवर्ग आणि महिला प्रवर्गासाठी किती प्रभाग राखीव राहतात, यावर अनेकांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय होणार आहे. या सोडतीच्या कार्यक्रमाकडे शहरातील लोकप्रतिनिधी, पक्षपदाधिकारी, इच्छुक उमेदवार आणि नागरिकांचेही लक्ष लागले आहे. आरक्षण सोडत निवडणुकीच्या प्रक्रियेतील पहिलाऔपचारिक टप्पा असला तरी याच टप्प्यावरून पुढील राजकीय समीकरणांचा पाया रचला जाईल. इच्छुक उमेदवारांच्या एकूणच कारकिर्दीसह पक्षाची भूमिका आदी नजरेसमोर ठेवून राजकीय पक्षांच्या प्रचाराची प्रभागनिहाय रणनीती ठरविली जाईल.