ना हरकत प्रमाणपत्रासाठी दीड लाख रुपयांच्या लाच प्रकरणात पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालिका आरती आळे यांनी दीड लाखांची लाच मागितली होती. त्यात पुरातत्व व वस्तुसंग्रहालय विभागाचे तत्कालीन संचालक तेजस गर्गेंचा अर्धा वाटा म्हणजेच ७५ हजारांचा वाटा होता. ही बाब तेजस गर्गेंनी आरती आळेंशी फोनवर बोलताना मान्य केली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (ACB) अधिकारी तेजस गर्गेंचा शोध घेत आहेत. तेजस गर्गे अद्यापही फरार आहेत. सदर प्रकरणाला १५ दिवस उलटून गेले आहेत तरीही तेजस गर्गे फरार आहेत. त्यांनी अंतरिम जामीन मिळावा म्हणून जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. जो फेटाळण्यात आला. आता अटक टाळण्यासाठी त्यांनी वरच्या कोर्टात धाव घेतली आहे.

तेजस गर्गेंच्या जामीन अर्जावर १२ जूनला सुनावणी

पोलीस आणि लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांना पुण्याहून गुंगारा देण्यात तेजस गर्गे यशस्वी ठरले. लाचखोरीचं हे प्रकरण उघडीस आल्यापासून तेजस गर्गे फरार आहेत. त्यांनी केलेला अंतरिम जामिनासाठीचा अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. त्यानंतर आता त्यांनी वरच्या कोर्टात अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी १२ जून रोजी होणार आहे. आरती आळे यांना लाच प्रकरणात अटक करण्यात आलेली नाही कारण त्या प्रसूती रजेवर आहेत. मात्र त्यांच्या नाशिक येथील घरात हे प्रकरण उघडकीस आलं आहे. नाशिक येथील ज्या भाडेतत्वारच्या घरात आरती आळे राहतात ते घर तेजस गर्गेंच्या नावावर असल्याची बाबही उघड झाली आहे.

हे पण वाचा- तेजस गर्गेच्या मुंबईतील घराची तपासणी

तेजस गर्गेंच्या घराच्या झडतीत आढळली ३ लाख १८ हजारांची रोख रक्कम

तेजस गर्गे १५ दिवसांपासून फरार आहेत. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. मागच्या बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने गर्गे यांच्या मुंबई येथील घराची तपासणी करण्यात आली. त्या झडतीत लाचलुचपत विभागाला ३ लाख १८ हजारांची रोख रक्कम आढळून आली. तेजस गर्गेंच्या पत्नीसमोर घराची झडती घेण्यात आली. तेजस गर्गेंच्या पत्नीच्या खात्यात २० लाखांची रक्कम आहे असंही एसीबीने सांगितलं आहे ती रक्कम कुठून आली याचाही तपास सुरु आहे.

हे प्रकरण नेमकं काय ?

तक्रारदाराला कारखाना सुरु करण्यासाठी राज्य पुरातत्व विभागाच्या नाशिक सहाय्यक संचालक कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र हवं होतं. त्यांनी सरकार वाड्यातील प्राचीन वास्तूत कार्यरत असलेल्या सहाय्यक संचालक आरती आळे यांच्याकडे यासाठी अर्ज केला होता. ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याच्या बदल्यात आरती आळे यांनी दीड लाखांची लाच मागितली. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या आदेशानंतर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. लाचेची रक्कम स्वीकारली असताना त्यांना ताब्यात घेण्यात आलं. पोलीस निरीक्षक एन. बी सूर्यवंशी, सुवर्णा हांडोरे यांनी ही कारवाई केली. आरती आळे या मातृत्वाच्या रजेवर आहेत त्यामुळे त्यांना अटक करण्यात आलेली नाही. त्यांच्या घरी लाचलूचपत विभागाचे अधिकारी गेले होते. नाशिकच्या राणे नगर या ठिकाणी असलेल्या नयनतारा गृहप्रकल्पातील फ्लॅट क्रमांक १७ मध्ये त्यांनी दीड लाख रुपये स्वीकारले. यानंतर राज्य पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांना हिश्श्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी संमती दर्शवली त्यामुळे तेजस गर्गेंवरही गुन्हा दाखल करण्यात आला.

तेजस गर्गे अजूनही फरार

तेजस गर्गेंवर कारवाई झाल्यानंतर ते मागील १५ दिवसांहून अधिक काळ फरार झाले आहेत. पोलिसांचं एक पथक आणि मुंबई लाचलूचपत विभागाचे अधिकारी त्यांच्या मागावर आहेत. एकदा त्यांनी पुण्यातून पोलिसांना गुंगारा दिला. त्यानंतर त्यांचा शोध लागलेला नाही. तेजस गर्गेंचा अंतरिम जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. अशातच आता त्यांनी अटकेची नामुष्की टाळण्यासाठी वरच्या कोर्टात अर्ज केला आहे.