scorecardresearch

नाशिक : रामसेतू वाचविण्यासाठी बचाव अभियानाकडून उपाययोजनांची मांडणी

पंचवटी आणि नाशिक शहराला जोडणारा गोदावरी नदीवरील ऐतिहासिक रामसेतू तोडण्याच्या हालचाली स्मार्ट सिटी कंपनीकडून केल्या जात आहेत.

ramsetu
( पंचवटी आणि नाशिक शहराला जोडणारा गोदावरी नदीवरील ऐतिहासिक रामसेतू )

स्मार्ट सिटी कंपनीकडून गोदावरी नदीवरील ऐतिहासिक रामसेतू तोडण्याच्या हालचाली

पंचवटी आणि नाशिक शहराला जोडणारा गोदावरी नदीवरील ऐतिहासिक रामसेतू तोडण्याच्या हालचाली स्मार्ट सिटी कंपनीकडून केल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. हा पूल वाचविण्यासाठी रामसेतू बचाव अभियानाच्या वतीने काही उपाययोजना सुचविण्यात आल्या असल्याची माहिती कल्पना पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहर परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यासह पुलाची नव्याने बांधणी करण्यात येणार आहे. नारोशंकर मंदिराजवळ असणारा रामसेतू तोडत त्या ठिकाणी नव्याने पूल बांधण्यात येणार आहे. या अनुषंगाने येथील दोन सांडवे तोडण्यात आल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी रामसेतूचा एकमेव आधार घ्यावा लागतो. त्यामुळे रामसेतू तोडल्यास नाशिक, पंचवटीतील रहिवाशांना ये-जा करणे प्रचंड अडचणीचे ठरणार आहे. यासंदर्भात अभियानाच्या वतीने काही उपाय सुचविण्यात येत आहेत.

गंगापूर धरणाचा गाळ त्वरित काढण्यात यावा, गोदावरी नदीचे काँक्रीटीकरण काढावे, त्यामुळे नदीपात्र खोल होईल. नदीपात्रातील नैसर्गिक स्त्रोत खाली जाईल आणि पाणी जिरण्याचे काम होईल. रामसेतूजवळ असलेली स्मारके, कपूरथळा, पुरातन मंदिरे आणि वास्तू आजही महापुराचे दणके सहन करून दमदारपणे उभी आहे. त्यांचाही विचार व्हावा, रामसेतूचे मजबुतीकरण आणि डागडुजी केल्यास तोही ताठपणे उभा राहील. ब्रिटिशांनी होळकर पुलाची हमी संपलेली असल्याचे घोषित केल्यावरही त्या पुलाचे नाशिक मनपाने मजबुतीकरण केले आहे. त्यास आजपर्यंत काही झालेले नाही.

नाशिक मनपा आणि स्मार्ट सिटीच्या वतीने रामसेतूची पाहणी करण्यात आली. पुलाची डागडुजी करता येणे शक्य आहे. सदरचे काम अधिकाऱ्यांनी केलेले नाही. गोदाघाट, रामसेतू यांचे चांगल्या प्रकारे सुशोभीकरण करणे गरजेचे आहे. जिथे गरज आहे तेथे स्लॅब टाकून रामसेतू मजबूत होऊ शकतो. रामसेतूविषयी चुकीची माहिती पसरत असल्याने जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे. रामसेतू हा पंचवटी ते सराफ बाजार, कापड बाजार, मेनरोड, पूर्व पश्चिम भागास जोडणारा एकमेव पादचारी पूल असल्याने तो नागरिकांसाठी अत्यंत गरजेचा आहे. शासनाचा विकास करण्याचा उद्देश असला तरी ऐतिहासिक स्थळे कशी शाबूत राहतील, हेही पाहावे. स्मार्ट सिटीच्या विकास कामात सुसूत्रता अजिबात नाही. भविष्यकालीन नियोजन दिसत नाही. कारण नसताना रस्ते खोदायचे आणि दोन, तीन महिने तशाच अवस्थेत ठेवायचे, असा आरोप अभियानने केला आहे.

रामसेतू आहे त्या स्थितीत ठेवून पुलाचे मजबुतीकरण व सुशोभीकरण करावे. रामसेतू तोडण्याच्या हालचाली होत असल्याने त्या थांबविण्यात याव्यात, जर या प्रकरणामुळे काही अशांतता निर्माण झाली तर त्यास स्मार्ट सिटीचे अधिकारीच जबाबदार राहतील. लवकरात लवकर रामसेतूवर स्लॅब टाकून त्याचे नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी रामसेतू बचाव अभियानाच्या वतीने पांडे यांनी केली आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-07-2022 at 00:02 IST