नाशिक : करोनाच्या विळख्यातून सुटका होण्यासाठी जिल्हा आणि महापालिका प्रशासनाची धडपड सुरू असताना या आजाराकडे कमाईची संधी म्हणून काही जण पाहत आहेत. रेमडेसिविर इंजेक्शनचा असलेला तुटवडा लक्षात घेत त्याची जादा दराने विक्री करणाऱ्यांसह हे इंजेक्शन पुरविणाऱ्यांचे जाळे उद््ध्वस्त करण्याचे काम आडगाव पोलिसांकडून होत आहे. आतापर्यंत या प्रकरणी अटक केलेल्यांची संख्या १० झाली असून ६३ इंजेक्शन कारवाईत जप्त करण्यात आले आहेत.
काही दिवसांपूर्वी महामार्ग परिसरातील के . के . वाघ महाविद्यालयाजवळ दोन युवती रेमडेसिविरची दोन इंजेक्शन ५४ हजार रुपयांना विकण्याचा प्रयत्न करत असताना अन्न व औषध प्रशासन आणि आडगाव पोलिसांच्या पथकाने रंगेहात पकडले होते. त्यांनी दिलेल्या माहितीतून इतर दोघांनाही अटक करण्यात आली. श्रुती उबाळे, जागृती शार्दूल, स्नेहल पगारे, कामेश बच्छाव अशी या चौघांची नावे आहेत. संशयितांना दोन दिवस
पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. ही इंजेक्शन पालघर येथून आणल्याची कबुली त्यांनी दिली. आडगाव पोलिसांनी त्यानुसार माग काढत पालघर येथून दोघांना ताब्यात घेतले.
चौकशीत वाडा येथील एक आणि नाशिक येथील एक अशा अन्य दोघांचा या प्रकरणात समावेश असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सुनील गुप्ता, महेश पाटील (रा. पालघर), अभिषेक शेलार (रा. वाडा), रोहित मुठाळ (रा. नाशिक) यांना अटक के ली. त्यांच्याकडील २० इंजेक्शनही जप्त केले. इंजेक्शन बनविणाऱ्या कंपनीचा वैद्यकीय प्रतिनिधी हाच मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाल्यानंतर सिध्देश पाटील यास बोेईसर येथील त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ६३ इंजेक्शन जप्त करण्यात आले. नुकतीच या प्रकरणात पोलीसांनी देवेन नाईक (२१, रा. भोईसर) यालाही अटक केली. त्यामुळे अटक के लेल्यांची संख्या १० झाली आहे.
कंपनीचा यात सहभाग नाही
रेमडेसिविर इंजेक्शन काळाबाजार प्रकरणात आतापर्यंत आडगांव पोलिसांनी १० जणांना अटक केली असून हे सर्व तरुण आहेत. यातील मुख्य सूत्रधार सिद्धेश पाटील हा कंपनीतील कर्मचारी आहे. मात्र कंपनीचा या प्रकरणाशी संबंध नाही. सिध्देश याने संधी साधत अंतर्वस्त्रात इंजेक्शन लपवत कंपनीच्या बाहेर आणून त्याची विक्री केल्याची कबुली दिली आहे. नाशिक येथून २० तर बोईसर येथून ६३ इंजेक्शन ताब्यात घेण्यात आले आहेत. – इरफान शेख (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आडगांव)