गोदाप्रेमी नागरी सेवा समितीचा प्रश्न
शहरात पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली असून, केंद्र व राज्य सरकारकडून पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध करण्यात आल्यानंतरही टंचाई तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा करण्याचे कारण काय, असा प्रश्न येथील गोदाप्रेमी नागरी सेवा समितीच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने या प्रश्नी आठवडाभरात भूमिका मांडण्याची मागणीही समितीने केली आहे.
सध्या शहरात पाणीकपात करण्यात आली असल्याने काही भागात कमी-जास्त प्रमाणात नळ पाणीपुरवठा होत आहे. विस्कळीत पाणीपुरवठय़ामुळे शहराच्या काही भागात नागरिकांमध्ये असंतोष असताना मंगळवारी पाणीपुरवठा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. परंतु अभियंत्यांची वेळ घेऊनही ते कार्यालयातून निघून गेल्याचे समितीने म्हटले आहे. त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क न झाल्याने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. सोनवणे यांनी पुढील चर्चेसाठी बोलविण्याचे आश्वासन दिल्यानंतर समितीचे शिष्टमंडळ माघारी फिरले.
समितीच्या वतीने सादर केलेल्या निवेदनात विविध योजनांचा आढावा घेण्यात आला असून, सद्य:स्थितीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. केंद्र सरकारने राबविलेल्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत पाणीपुरवठा प्रकल्पासाठी ५०.५२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. इतकी रक्कम खर्च करूनही अद्याप तो पूर्ण झालेला नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. अभियानातील प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेचा पहिला टप्पा २०१६ पर्यंत आणि दुसरा त्यानंतर पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यासाठी ४०० कोटीहून अधिक निधीची गरज आहे.
दुसरीकडे सिंहस्थ कुंभमेळा २०१५-१६ विकास आराखडय़ात महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने फुलेनगर परिसरात जलशुद्धीकरण केंद्र अस्तित्वात आले. मात्र त्यावर पडणारा भार पाहता निलगिरी बाग येथे नवा प्रकल्प उभारण्याचे काम प्रस्तावित असताना ते कुठपर्यंत झाले, याविषयी समितीने स्पष्टीकरण मागितले आहे.
अभियान व सिंहस्थ आराखडा यासाठी मोठय़ा प्रमाणावर खर्च होऊनही शहरात पाणीकपात लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे शहर परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पाण्याची कृत्रिम टंचाई जाणवत असून नागरिकांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.
शहरातील सिडकोसह पंचवटी परिसरात बहुतेक वेळा दुरुस्तीच्या नावाखाली कमी दाबाने पाणीपुरवठा होणे, एकवेळ पाणीपुरवठा बंद ठेवणे, असे प्रकार होत असतात. त्यामुळे नागरिक हैराण झाले असून हा त्रास कमी करण्यासाठी पालिकेने उपाय योजण्याची आवश्यकता असताना पाणीपुरवठा विभागाचे अभियंता चर्चेसाठी वेळ देऊनही उपस्थित राहात नसल्याबद्दल समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.