पोलीस चौकीतच युवकावर हल्ला
‘स्मार्ट सिटी’च्या गमजा मारणाऱ्या नाशिकची पुन्हा एकदा ‘गुन्हेगारांचे शहर’ अशी प्रतिमा निर्माण होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू असून आतापर्यंत रस्त्यावर, सर्वसामान्यांच्या घरांपर्यंत पोहोचलेल्या गुन्हेगारीने बुधवारी रात्री थेट पोलीस चौकीतच प्रवेश केल्याची घटना पंचवटी येथे घडली. पोलिसांसमक्ष झालेल्या दोन गटातील हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खून, लूटमार, अपहरण, चोरी आदी घटनांमुळे धगधगणाऱ्या नाशिकमध्ये पुन्हा सहा-सात वर्षांपूर्वीचे दिवस येतात की काय, असे वाटू लागले आहे. गुन्हेगारी घटनांचा आलेख झपाटय़ाने उंचावत असताना नाशिकचे पालकत्व सांभाळणारे गिरीश महाजन, स्थानिक आमदार आणि कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणारे पोलीस आयुक्त अद्यापही अमेरिकेत कुंभमेळ्याच्या यशस्वी नियोजनाचे तुणतुणे वाजवीत आहेत.
राजाश्रयामुळे फोफावणारी गुन्हेगारी नाशिककरांना नवीन नाही. सहा ते सात वर्षांपूर्वी राजकीय वरदहस्तामुळे गल्लीबोळात अनेक भाई उदयास आले होते. वाहनांची जाळपोळ, गोळीबार, खुलेआम धुमाकूळ, लूटमार, महिलांच्या अंगावरील दागिने खेचून नेणे, आदी अगणिक घटनांनी कळस गाठला होता. अट्टल गुन्हेगारांना गायब करण्यापासून ते पोलीस ठाणे वा न्यायालयात त्यांना हजर करण्यापर्यंतच्या कार्यात काही राजकीय व्यक्तींचा उघडपणे सहभाग होता. कायदा व सुव्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे निघाल्याने त्यावेळी नाशिकची तुलना बिहारशी केली गेली होती. या पाश्र्वभूमीवर पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेणारे कुलवंतकुमार सरंगल यांनी ही ओळख पुसून टाकण्यासाठी धडाडीने प्रयत्न केले. गुन्हेगारांबरोबर त्यांना रसद पुरविणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांची खास पोलिसी पद्धतीने भर चौकांमध्ये चौकशी केली. गुन्हेगारी टोळक्यांवर ‘मोक्का’ लावून वचक निर्माण केला. अधिकाऱ्यांना जनतेमध्ये फिरून बैठका घेण्यास बजावले. अविरतपणे चाललेल्या अशा विविधांगी कारवायांमुळे पोलिसांचा तेव्हा निर्माण झालेला वचक सरंगल यांची बदली झाल्यानंतर मागील काही महिन्यांत घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांनी कमी झाल्याचे अधोरेखित झाले आहे.
मागील पाच ते सहा महिन्यांतील गुन्हेगारीचा आलेख पाहिल्यास नाशिक गुन्हेगारांचे शहर बनल्याचे दृष्टिपथास येत आहे. बुधवारी रात्री पंचवटीतील काटय़ा मारुती पोलीस चौकीत घडलेली घटना म्हणजे या सर्वाचा कळस म्हणावी लागेल. पोलिसांना क्षुल्लक समजणाऱ्या टोळक्यांची वाढलेली हिंमत सर्वसामान्यांसाठी धडकी भरवणारी आहे. नवरात्रीत नाग चौक व गणेशवाडी येथील गटांमध्ये किरकोळ वाद उद्भवून प्रकरण हाणामारीपर्यंत गेले होते. त्या प्रकरणी संबंधितांनी परस्परांविरुद्ध तक्रारीही दिल्या होत्या. या संदर्भात दोन्ही गटांत समेट घडवून आणण्याचा प्रयत्न खुद्द पोलीस दलातील काहींनी केल्याचे सांगितले जाते. त्या अनुषंगाने संबंधितांना पोलीस चौकीत बोलाविण्यात आले होते. पोलिसांसमक्ष संबंधितांमध्ये पुन्हा वाद उफाळून आला आणि हाणामारी झाली. यावेळी एका गटाने केलेल्या हल्ल्यात जितू साबळे हा युवक गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे पोलीस चौकीत एकच गोंधळ उडाला. त्याचा फायदा घेऊन काहींनी पलायन केले. या प्रकरणी पोलिसांनी नाग चौकातील सागर गरड, विकी शिंदे, दिगंबर धुमाळ, भारत गरड व गणेश शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, खून, हाणामाऱ्या, पाळत ठेऊन रोकड वा महिलांच्या अंगावरील दागिने लंपास करणे, दुचाकी चोरी, घरफोडय़ा असे अगणिक प्रकार सातत्याने घडत असूनही पोलीस यंत्रणा ठिम्म आहे. अनेक प्रकरणांत तर गुन्हे दाखल करण्याचे टाळले जाते, असा तक्रारदारांना अनुभव आहे. पोलीस चौकीत झालेल्या हाणामारीने शहरात पोलिसांचे राज्य आहे की गुन्हेगारांचे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जखमी झालेल्या युवकाने हल्ला पोलीस चौकीत झाल्याचे माध्यमांना सांगितले असले तरी काही अधिकारी तो बाहेर झाल्याचे सांगतात, कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असताना नाशिकचे पालकमंत्री, स्थानिक आमदार व पोलीस आयुक्त अमेरिकेतील कार्यक्रमांमध्ये रममाण आहेत. कुंभमेळ्याच्या यशस्वी नियोजनाबद्दल परदेशात सत्कार स्वीकारणाऱ्या महोदयांनी नाशिकमधील अराजकतेकडे गांभीर्यपूर्वक पाहण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
मध्यस्थी अंगलट?
गुन्हा दाखल करून तपास करणे ही तपास यंत्रणेची कार्यपद्धती. पण, तक्रारीवर अशी कारवाई करण्याऐवजी गुन्हा दाखल होऊ नये म्हणून समेट घडवून आणण्याचा प्रयत्न पोलिसांच्या अंगलट आल्याचे दिसत आहे. दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे प्रकरण मिटविण्यासाठी संबंधितांना पोलीस चौकीत बोलविण्यात आले होते. यावेळी पोलिसांदेखत हाणामारी होऊन एक तरुण जखमी झाला. मारझोड करून संशयित चौकीतून पळूनही गेले.