रिक्षा व टॅक्सीसाठी प्रवासी वाहतूक परवाना देण्याच्या प्रक्रियेत शासनाने केलेली अवास्तव शुल्कवाढ रद्द करावी तसेच महापालिका व शहर वाहतूक शाखा यांनी शहरातील प्रमुख रस्त्यांच्या बाजूस वाहनतळ तसेच ‘नो पार्किंग झोन’ यांचे फलक तत्काळ लावावेत, यासह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी सर्वपक्षीय रिक्षा संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मागण्या मान्य न झाल्यास तीन मार्च रोजी रिक्षा-टॅक्सी-मालमोटार बंद ठेवण्यात येतील, असा इशारा संघटनांनी दिला आहे.
राज्य शासनाने महाराष्ट्र मोटर वाहन अधिनियम १९८९ मध्ये विविध कलमांनुसार १० फेब्रुवारीपासून परवाना शुल्कात मोठय़ा प्रमाणात वाढ केली आहे. परवाना घेण्यासाठी २०० रुपये असणारे शुल्क आता थेट एक हजार रुपये झाले आहे. परवाना नूतनीकरणासाठी १०० ऐवजी पाच हजार, नवीन परवान्यासाठी १५० वरून शुल्क १० हजार रुपये करण्यात आले आहे. करारावरील वाहनांसाठी परवाना, टप्पा वाहनांसाठी परवाना, पर्यटक वाहनांसाठी परवाना वा त्याचे नूतनीकरण, राष्ट्रीय परवाना व त्याचे नूतनीकरण, अशा सर्वासाठी शासनाने प्रचंड शुल्कवाढ केल्याचा आरोप संघटनांनी केला. या अवास्तव दरवाढीमुळे रिक्षाचालकांचे आर्थिक शोषण होत असून भाडय़ाने रिक्षा चालविणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही दरवाढ मागे घ्यावी आणि नव्याने दरवाढ सुचविताना रिक्षाचालक संघटनेला विश्वासात घ्यावे, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे.
शहरात चोरी-घरफोडी, सोनसाखळी चोरी, भरदिवसा खून, हाणामारीचे प्रकार वाढले आहेत. अकार्यक्षम पोलिसांची बदली करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
वाहनांची वाढती संख्या आणि वाहनतळांची अनुपलब्धता यामुळे प्रमुख रस्ते व चौक वाहतूक कोंडीत सापडले आहेत. त्यांची या कोंडीतून मुक्तता करण्यासाठी महापालिका आणि शहर वाहतूक शाखा यांनी सर्वेक्षणाद्वारे निश्चित केलेल्या जागांवर वाहनतळाची व्यवस्था करावी, अशी मागणी शिवाजी भोर यांनी केली. नियमानुसार रिक्षा-टॅक्सी-मालमोटारचा व्यवसाय करतांना शहर वाहतूक शाखा व खाकी वर्दीतील शासकीय सेवकांचा जो जाच सहन करावा लागतो, तो बंद करावा, वाहन तपासणीवेळी कायद्याचे पालन करावे, शहरातील रिक्षा-टॅक्सी-मालमोटारधारकांसाठी निश्चित केलेले थांबे त्वरित कार्यान्वित करावे, दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करू नये, आदी मागण्या करण्यात आल्या. मागण्या मान्य न झाल्यास मार्च महिन्यात रिक्षाचालक आपला व्यवसाय बंद ठेवतील असा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला. मोर्चा सर्वपक्षीय रिक्षा संघटनांचा असला तरी त्यात गर्दी मात्र तुरळक होती. या मोर्चामुळे शालिमार चौक, महात्मा गांधी रोड आदी मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी झाली. बारावीची परीक्षा, रविवार कारंजा ते अशोक स्तंभ वाहतूक मार्गात केलेले बदल यामुळे आधीच वाहतुकीचे नियोजन कोलमडले असताना मोर्चामुळे त्यात आणखी भर पडली.