नाशिक : युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने पुकारलेल्या देशव्यापी संपात जिल्ह्य़ातील राष्ट्रीयकृत बँकांच्या ३५० शाखांमधील अधिकारी-कर्मचारी सहभागी झाल्यामुळे कामकाज पूर्णत: ठप्प झाले. संपामुळे शहरात १५० कोटींचे व्यवहार होऊ शकले नाहीत. विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या शहर शाखेसमोर निदर्शने केली.
देशव्यापी संपात जिल्ह्य़ातील सर्व राष्ट्रीयकृत बँक कर्मचारी, अधिकारी यांच्या नऊ संघटना सहभागी झाल्या आहेत. संपामुळे जिल्ह्य़ातील राष्ट्रीयकृत बँकांच्या ३५० शाखांचे दैनंदिन कामकाज थांबले. बँक कर्मचारी अनेक महिन्यांपासून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधत आहे. त्याबद्दल सकारात्मक निर्णय न झाल्यास संपाचे पुढील पाऊल बेमुदत संप असेल. ११ ते १३ मार्च या काळात देशव्यापी संप आणि एक एप्रिलपासून बँक कर्मचारी बेमुदत संप करणार असल्याचे बँक कर्मचाऱ्यांचे नेते शिरीष धनक यांनी सांगितले.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या शहर शाखेसमोर सकाळी कर्मचारी जमा झाले. त्यांनी एकत्र येऊन निदर्शने केली. एक नोव्हेंबर २०१७ पासून २० टक्के पगारवाढ मिळायला हवी, असा संघटनांचा आग्रह आहे. सरकार बँकांमधील एनपीए आणि तोटय़ाचे कारण देऊन वेतनवाढ देण्यास असमर्थता दाखवत आहे. एनपीए वाढण्यास आणि तोटा होण्यास सरकारचे बँकिंगविषयक धोरण जबाबदार असल्याचा आक्षेप संघटनेने नोंदविला. पाच दिवसांचा आठवडा, विशेष अनुदान प्राथमिक वेतनात समाविष्ट करणे, कुटुंब निवृत्तिवेतनात वाढ आणि निवृत्तिवेतन सुधारणा करण्याची निकड असल्याचे संघटनेने म्हटले आहे. १० राष्ट्रीयकृत बँकांचा चार बँकांमध्ये विलीनीकरणाचा निर्णय रद्द करावा, अशी मागणीही संघटनेने केली.