जळगाव : जिल्ह्यातील भुसावळमध्ये नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिला राखीव निघाल्यानंतर त्या जागी आपल्या सौभाग्यवतींची वर्णी लावण्यासाठी मंत्री संजय सावकारे प्रयत्नशील होते. प्रत्यक्षात, रजनी सावकारे यांनी शुक्रवारी भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाल्यापासून जास्तीत जास्त ठिकाणी आपली सत्ता असावी म्हणून महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची नेते मंडळी कामाला लागली आहेत. या दरम्यान, भाजप हा सर्वात मोठा पक्ष लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकांप्रमाणे आताही आपले वर्चस्व कायम राखण्याचा प्रयत्न करत आहे. विशेषतः नगराध्यक्षपदांवर आपल्या कुटुंबातील व्यक्तींना संधी देण्याच्या सावध हालचाली भाजप नेते मंत्री गिरीश महाजन, संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण यांनी काही दिवसांपासून सुरू केल्या होत्या. त्या संदर्भात इतके दिवस जोरदार चर्चा सुरू असताना संबंधित नेत्यांनी कोणतीही थेट प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आल्यावर आता तिघांनी हळूहळू आपले पत्ते ओपन करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे.

भुसावळ नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या सौभाग्यवती प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनीही नगराध्यक्षपदासाठी शुक्रवारी समर्थक महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर स्वतः मंत्री सावकारे यांनी समाज माध्यमावर त्यांच्या सौभाग्यवती उमेदवारी दाखल करतानाची छायाचित्रे प्रसारित केल्याचे दिसून आले. निवडणुकीच्या माध्यमातून भाजपची सत्ता प्रस्थापित करून भुसावळ शहराच्या विकासाला नवी दिशा देण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला.

जामनेरमध्येही यंदा नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला राखीव निघाले आहे. त्यामुळे त्या जागी आपल्या सौभाग्यवती साधना महाजन यांची वर्णी लावण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. यापूर्वीही एकदा साधना महाजन या जामनेरच्या नगराध्यक्षा राहिलेल्या आहेत आणि त्यांना त्या पदाचा चांगला अनुभव आहे. त्यानुसार, एक-दोन दिवसांत जामनेरमधील राजकीय घडामोडी समोर येण्याची चिन्हे आहेत. चाळीसगाव शहरातही यंदा नगराध्यक्षपद खुल्या जागेसाठी आहे. अर्थातच, त्या जागी आपल्या सौभाग्यवती प्रतिभा चव्हाण यांची वर्णी लावण्यासाठी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी हालचाली वाढविल्याची चर्चा आहे.

माझ्या घरातील कोणताच सदस्य सार्वजनिक निवडणुकीत उभा राहणार नाही, असे आमदार चव्हाण यांनी यापूर्वीच जाहीर केल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी प्रतिभा चव्हाण यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जाते. दुसरीकडे, पाचोऱ्यात भाजपला आव्हान दिल्याने राज्यभर प्रसिद्धीच्या झोतात आलेले शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनीही त्यांच्या सौभाग्यवती सुनिता पाटील यांना नगराध्यक्षपदाच्या उमेदवार घोषित केले आहे. त्याठिकाणी शिंदे गटाच्या विरोधात भाजप अशी थेट लढत रंगण्याची चिन्हे आहेत.