वाहतूक पोलिसावर प्रश्नांची सरबत्ती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महात्मा गांधी रस्त्यावर चारचाकी वाहनांकडे दुर्लक्ष करीत केवळ दुचाकी वाहने उचलल्याच्या कारणावरून वाहनधारकांनी वाहतूक पोलिसांच्या ‘टोईंग’ पथकातील कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. बेशिस्त वाहने उचलण्याच्या कारवाईत टोईंग पथक दुचाकी वाहनधारकांवर कारवाई करते, परंतु चारचाकी वाहनधारकांना अभय देत असल्याची भावना पुन्हा एकदा उमटली. या गोंधळात महात्मा गांधी रोडवर अर्धा तास वाहतुकीचा खोळंबा झाला. संबंधित दुचाकीधारकाने टोईंग पथकाच्या ताब्यातून आपली दुचाकी सोडवून घेतली.

रस्त्यावर अस्ताव्यस्त उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे ठिकठिकाणी होणारी वाहतूक कोंडी हा नित्याचा भाग बनला आहे. वाहनतळासाठी पुरेशी जागा नसल्याने दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने जिथे जागा मिळेल, तिथे उभ्या केल्या जातात. बेशिस्त वाहनधारकांना लगाम घालण्यासाठी वाहतूक पोलीस ही वाहने उचलून दंडात्मक कारवाई करते. परंतु, ही कारवाई अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. महात्मा गांधी रोड हा मुख्य बाजारपेठेतील महत्त्वाचा रस्ता. या परिसरातून टोईंग पथक बेशिस्त वाहने उचलण्याचे काम सातत्याने राबविते. वाहनांची मोठी वर्दळ असल्याने वाहतूक संथपणे सुरू असते. त्यात बेशिस्त वाहनधारकांमुळे कोंडीत भर पडते. मंगळवारी दुपारी दुचाकी वाहने उचलणाऱ्या वाहतूक पोलिसांशी महात्मा गांधी रस्त्यावर वाहनधारकाने हुज्जत घातल्याने गर्दी जमा झाली  यामुळे दुपारच्या वेळी १५ ते २० मिनिटे वाहतुकीचा खोळंबा झाला.

महात्मा गांधी रस्त्यालगत दुचाकी वाहने उभे करून वाहनधारक खरेदीसाठी गेले होते. वाहतूक पोलिसांच्या वाहनाने ही वाहने उचलण्यास सुरुवात केली. हे लक्षात येताच एक वाहनधारक धावत आला. त्याने आपली दुचाकी सोडण्याची मागणी केली.  दंडात्मक कारवाई झाल्यानंतर वाहन कार्यालयातून सोडले जाईल, असे वाहतूक पोलिसाने सांगितल्यावर संबंधित वाहनधारकाने थेट रस्त्यात टोईंग वाहनासमोर वाहतूक पोलिसाशी हुज्जत घातली. आपली गाडी दोन मोटारींच्या मध्ये होती. मोटारीचा अडथळा वाहतुकीस होत नसेल तर आपल्या गाडीचा कसा होतो, चारचाकीवर कारवाई होत नसेल तर  दुचाकीवर का, असे प्रश्न उपस्थित केले. कर्मचारी ऐकत नसल्याने तो गाडीसमोरून हटण्यास तयार नव्हता. यामुळे बघ्यांची गर्दी जमली. मुख्य रस्त्याची जागा टोईंग वाहनाने व्यापली असताना गर्दीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. एकंदर स्थिती लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांनी वाहनधारकास समज देत त्याचे वाहन उतरवून दिले.

दरम्यान, टोईंग वाहने काही विशिष्ट भागातच फिरतात. ठेकेदाराचे कर्मचारी कोणालाही जुमानत नाही, वाहनांची आदळआपट करतात, अशी वाहनधारकांची तक्रार आहे. टोईंग वाहनामुळे मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा होतो, याकडे नागरिक, व्यापाऱ्यांनी लक्ष वेधले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bike owner angry on towing staff for ignoring car
First published on: 17-01-2018 at 02:16 IST