नाशिक : शहरातील उंटवाडी आणि मायको चौक येथील प्रस्तावित उड्डाण पूलासह रस्ते कामात ५८८ झाडे तोडली जाणार आहेत. त्यास सर्व पातळीवरून कडाडून विरोध होऊ लागल्याने या कामासाठी पुढाकार घेणाऱ्या भाजपची ऐन निवडणुकीच्या तोंडावर चांगलीच कोंडी झाली आहे. त्यामुळे भाजपने पुलाबाबत पुनर्विचार सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत.

प्राचीन भारतीय वृक्ष वाचविणे गरजेचे आहे. त्याकरिता सर्व पर्यायांची पडताळणी केली जाईल. एका वास्तुविशारदाने उड्डाण पुलास अन्य मार्गाचा पर्याय सुचविला आहे. या सर्वाचा विचार करून भाजप उंटवाडीतील उड्डाण पुलाचे काम पुढे न्यायचे की नाही, याबाबत प्रशासनाशी चर्चा करणार आहे. उड्डाण पुलाच्या कामावरून भाजपमध्ये दोन गट पडलेले आहेत. या कामास विरोध करणाऱ्या शिवसेनेने नंतर मौन बाळगणे पसंत केले.

भाजपच्या एका नगरसेवकाने पुलाच्या प्रक्रियेतील अनियमिततेविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली. त्यावर न्यायालयाने उपरोक्त दावा जनहित याचिकेत रुपांतरीत करण्यास मान्यता दिली. झाडांवर उशिराने नोटीस लावत प्रशासनाने हरकती येणार नाही, याची दक्षता घेतली होती. तथापि, वृक्षतोडीस विरोध करणाऱ्या तब्बल अडीच हजार हरकती प्राप्त झाल्या आहेत. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्राचीन वटवृक्षासह वड, िपपळ वा तत्सम भारतीय झाडे वाचविण्यासाठी पुलाच्या आराखडय़ात बदल करण्याची सूचना केली. तर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सिडकोत उड्डाण पुलाची गरज काय, असा प्रश्न करत त्यास आक्षेप घेतला.

या पार्श्वभूमीवर, गुरूवारी महापौर सतीश कुलकर्णी यांनी उंटवाडीतील प्रस्तावित उड्डाण पुलाच्या मार्गातील झाडांची पाहणी केली. यावेळी उद्यान विभागातील अधिकारी उपस्थित होते. महापालिका निवडणुकीला केवळ महिनाभराचा अवधी आहे. पर्यावरणप्रेमींसह नागरिकांकडून वृक्षतोडीला कडाडून विरोध होत आहे. पर्यावरणप्रेमींनी अवमान याचिका दाखल केली आहे. उड्डाण पूल आणि वृक्षतोडीचा विषय प्रचारात  कळीचा विषय ठरेल हे लक्षात आल्यावर भाजपकडून सावधपणे पाऊल टाकले जात आहे.

सर्व शक्यता पडताळणार

उड्डाण पुलाच्या कामात वटवृक्षासह उंटवाडी रस्त्यावरील शेकडो झाडे बाधित होत असून हा मोठा प्रश्न आहे. भारतीय वृक्ष जगायला हवीत. ज्या झाडांचे आयुर्मान कमी आहे,  अशी किती झाडे आहेत, पुनरेपण किती झाडांचे होऊ शकेल, झाडांचे नुकसान न करता काय करता येईल, याचा विचार केला जाणार आहे. एका वास्तुविशारदांनी सुचविलेल्या पर्यायी मार्गाचा विचार केला जाईल. वटवृक्षासह उड्डाण पुलाच्या आराखडय़ात काय बदल करता येईल अशा सर्व शक्यता पडताळून प्रशासनाशी चर्चा करण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 – सतीश कुलकर्णी (महापौर, नाशिक)