सटाणा शहराच्या पिण्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शब्दानुसार राज्य शासनाने पुनद पाणी पुरवठा योजना कोणत्याही परिस्तिथीत पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सटाणा येथे दिली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविवारी पाठक मैदानावर नगर परिषदेतर्फे आयोजित शहर पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजनप्रसंगी पाटील यांनी संरक्षण राज्यमंत्री आणि खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी शहारासह तालुक्यातील विविध विकास कामांना गती दिल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष डॉ सुभाष भामरे यांनी शहरात सातत्याने पाणी टंचाईला तोंड द्यावे लगत असल्याने शहरवासीयांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ५१ कोटी रुपयांच्या शहर पाणी पुरवठा योजनेस मंजुरी दिल्याचे सांगितले. यावेळी कांद्याच्या प्रश्नावर गोंधळ घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना उद्देशून डॉ. भामरे यांनी शेती क्षेत्रासाठी पाणी पोचविण्यात सत्तर वर्षांत विरोधकांना अपयश आले असल्याची टीका केली. राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आगामी सात दिवसात शहरातील देवमामलेदार यशवंतराव महाराज स्मारक निर्मितीस गती देण्याचे आश्वासन दिले. नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी डॉ. सुभाष भामरे यांच्या पाठबळामुळे शहरविकासाला गती प्राप्त झाल्याचे स्पष्ट करीत शहर पाणी पुरवठा योजनेसह भुयारी गटार योजना पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे मांडले.

कार्यक्रमात सटाणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांची महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समिती अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल तसेच प्रसाद अहिरे या विद्यार्थ्यांची सी. एम. चषक स्पर्धेत राज्य पातळीवर निवड झाल्याबद्दल मंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. जितेंद्र मेतकर, महेंद्र शर्मा यांनी केले.

दरम्यान, सटाण्यास जलवाहिनीव्दारे पुनद धरणातून पाणी देण्यास विरोध करीत कार्यक्रमात आंदोलन करण्याचा इशारा देणारे कळवण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, शेतकरी संघटनेचे देवीदास पवार यांना पोलिसांनी रविवारी नजरकैदेत ठेवले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant patil about water scarcity
First published on: 11-02-2019 at 00:15 IST