लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत राज्याचे मंत्री, लोकप्रतिनिधी, इच्छुक उमेदवार आणि विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी रामनवमीच्या निमित्ताने बुधवारी पंचवटीतील प्रसिद्ध श्री काळाराम मंदिरात दर्शन घेतले. मंदिर प्रांगणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आणि शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे या दोन इच्छुक उमेदवारांची भेट झाली. उमेदवारीत मुख्य स्पर्धक असणाऱ्या भुजबळ यांचे चरणस्पर्श करुन गोडसे यांनी आशीर्वाद घेतले.

जानेवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचवटीतील श्री काळाराम मंदिरास भेट दिली होती. त्यानंतर महायुतीतील नेत्यांची या मंदिरात दर्शनासाठी रीघ लागली. लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी आणि त्यातच रामनवमी, यामुळे मंदिरात राजकीय नेत्यांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. श्रीराम नवमीनिमित्त मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

आणखी वाचा- दिंडोरी तालुक्यात साडेसहा लाखाचा गुटखा जप्त

महायुतीत नाशिकच्या जागेचा तिढा सुटलेला नाही. सर्वपक्षीय इच्छुकांनी आवर्जुन दर्शन घेत जागेचा तिढा सोडविण्यासाठी साकडे घातल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली. रामजन्मोत्सव सोहळ्यास राज्याचे अन्न,नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली. प्रभू श्रीरामाचे दर्शन घेत उपस्थित भाविकांना राम नवमीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुंबईचे अध्यक्ष समीर भुजबळ, डॉ. शेफाली भुजबळ, महंत सुधीरदास महाराज यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मंदिर प्रांगणात भुजबळ आणि शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे या दोन्ही इच्छुकांची भेट झाली. गोडसेंनी भुजबळांचे चरणस्पर्श केले. गोडसे आणि भुजबळ यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. ही जागा कुणाला मिळणार, यावर उभयतांचे भवितव्य अवलंबून आहे. या भेटीविषयी, भुजबळांनी खासदार गोडसे हे आपले मित्र असून मंदिरात योगायोगाने भेट झाल्याचे नमूद केले. आपण त्यांना शुभेच्छा दिल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा-नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट

नाशिकच्या जागेवरून महायुतीत संघर्ष आहे. भाजपकडून प्रारंभी आमदार राहुल ढिकले यांचे नाव पुढे केले जात होते. पंचवटीतील काळाराम मंदिर हे त्यांच्या नाशिक पूर्व मतदार संघात आहे. ढिकलेंसह आमदार देवयानी फरांदे, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, लक्ष्मण सावजी आदी भाजप पदाधिकाऱ्यांनी श्रीरामाचे दर्शन घेतले. विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते रात्री उशिरापर्यंत मंदिरात दर्शनासाठी येत होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal hemant godse and other political leaders gather in kalaram temple mrj