‘छोटा बच्चा जान के हम को..’, ‘.. हे बम बम भोले’ या एकाहून एक सरस हिंदी-मराठी चित्रपटातील बालगीतांची स्वरयात्रा.. स्वप्नात आहोत की प्रत्यक्षात हा आभास वाटणारा तारांकित हॉटेलमधील वावर.. अशा उत्साहपूर्ण वातावरणात शहर परिसरात मंगळवारी बाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. बाल दिनाचे औचित्य साधत शहरात शाळांमध्ये विविधांगी कार्यक्रमांची आखणी करण्यात

आली. मॉल तसेच सिनेमागृहाबाहेर आकर्षक सजावट करत कार्टुनच्या पेहरावातील मंडळींनी बच्चे कंपनीचे स्वागत केले.

येथील बागेश्री शिशुविहार बाल मंदिरच्या सहकार्याने मंगळवारी उंटवाडी रस्त्यावरील निरीक्षणगृहातील मुलांकरिता संगीत मैफल भरविण्यात आली. कार्यक्रमात बालकलाकार श्रेया गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार चंदुलाल शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विविध बालगीते सादर करत बच्चे कंपनीचे मनोरंजन करण्यात आले.

येथील मानवधन सामाजिक- शैक्षणिक विकास संस्थेच्या वतीने पाथर्डी फाटा येथील धनलक्ष्मी बाल विद्यामंदिरात बाल कलाकारांचा सहभाग असलेला ‘स्वरांजली यात्रा’ हा अभिनव उपक्रम घेण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बासरीवादक अनिल कुटे उपस्थित होते. सूरसंगम संगीत यात्रेत चिन्मय स्वरांजलीच्या २५ बालकलाकारांनी बासरीवादन केले. यावेळी संस्थेच्या अन्य शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.

रोटरी क्लब ऑफ नाशिक आणि हॉटेल एक्सप्रेस इनच्यावतीने बाल दिनाचे औचित्य साधत ‘एक दिवस स्वप्नातील’ या उपक्रमांतर्गत त्र्यंबकेश्वरच्या धोंडेगाव आश्रमशाळेतील १०० विद्यार्थ्यांना तारांकित हॉटेलची सफर घडवण्यात आली. मुख्य व्यवस्थापक ऋषीकेश जोशी, रोटरीचे अध्यक्ष दिलीपसिंग बेनिवाल यांच्या मार्गदर्शनाने उपक्रमाची आखणी झाली.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा जथा हॉटेल परिसरात आल्यानंतर थक्क झाला. तेथील वातावरण, जलतरण तलाव, उंच उंच इमारतींना असलेले काचेचे आवरण, लिफ्ट, आकर्षक रोषणाईने बच्चे कंपनीला भुरळ घातली. काहींनी हॉटेल परिसरातील खेळण्यांचा मनमुराद आनंद घेतला. हॉटेल व्यवस्थापनाने सीएसआर निधीचा वापर करत बच्चे कंपनीसाठी खास मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन केले. यावेळी विद्यार्थ्यांना हॉटेलची ओळख करून देण्यात आली. त्यात मिळणाऱ्या सुविधा, मनोरंजनात्मक खेळ, मार्गदर्शन आणि मिष्ठानाचे भोजन देण्यात आले.

आशी फाऊंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ नाशिक वेस्ट यांच्या सहकार्याने आयोजित क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. आशी फाऊंडेशनचा सागर वाघ हा मालिकावीर ठरला. विजेत्या संघाला सन्मानचिन्ह, रोख रक्कम देण्यात आली. या सोहळ्यात आशी फाऊंडेशनच्या अध्यक्षा रसिका अमोलिक उपस्थित होत्या. बालदिनानिमित्त विविध शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. गरजू मुलांना नवीन ब्लँकेट वाटप करण्यात आले.

बालसंशोधक, कलाकारांचा सन्मान

टी अ‍ॅण्ट टी एंटरप्राईजेसतर्फे जिज्ञासू, अभ्यासू आणि संशोधन, अभ्यास याची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘वाह क्या बात है’ हा अनोखा कार्यक्रम घेण्यात आला. कुसुमाग्रज स्मारक येथे झालेल्या कार्यक्रमात संशोधक सृष्टी नेरकर, बालकलाकार सई मोराणकर यांचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच त्यांची मुलाखत घेण्यात आली.

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.