कळवण ते मानूर रस्त्यावरील पुलावर रविवारी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्यानंतर कळवणकरांनी संताप व्यक्त केला आहे. व्यापारी संघटना आणि शहरातील त्रस्त नागरिकांनी संभाजी नगर गावठाण परिसरात सोमवारी सकाळी नाशिक-कळवण रस्त्यावर आंदोलन केले. आंदोलनामुळे दोन तास वाहतूक विस्कळीत झाली. रस्तेकामात हलगर्जी करणारा ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम अभियंता यांचे विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

हेही वाचा- सकाळी उद्घाटन अन रात्री दुकान आगीत खाक

व्यापारी संघटनेच्या वतीने देण्यात निवेदनात भूमिका मांडली आहे. कळवण शहरातून जाणाऱ्या मेनरोडचे काम अडीच ते तीन वर्षांपासून सुरु आहे. या कामाबाबत अनेक राजकीय पक्ष, संघटना , व्यापारी संघटनांनी वेळोवेळी आंदोलन करून काम त्वरित करण्याची मागणी केली आहे. मात्र ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून विलंब केला जात आहे. या दिरंगाईमुळे रस्त्याची एकाच बाजूने वाहतूक सुरु आहे. यामुळे शहरातील आणि बाहेरील वाहनचालकांना हकनाक वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. यामुळे छोटे अपघात वाहन चालकांमध्ये वादविवाद नित्याचेच झाले आहेत. याआधी व्यापारी संघटनेने केलेल्या आंदोलनावेळी संबंधित कार्यकारी अभियंत्यांच्या उपस्थितीत ठेकेदाराने ४५ दिवसात काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र साडेचार महिने उलटूनही काम पूर्ण झालेले नाही. तालुक्यातील केंद्रीय राज्यमंत्री तसेच एक आमदार असूनही तालुक्यातील समस्यांकडे कोणाचे लक्ष नसल्याची खंत व्यक्त केली आहे.

हेही वाचा- “..आणि तशाच प्रकारच्या चिन्हाची निवड करावी लागणार” : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विधान

मेनरोडच्या रखडलेल्या कामामुळे मोठा अपघात होण्याची चर्चा होत असताना रविवारी सायंकाळी यशवंतराव चव्हाण नागरी पतसंस्थेचे व्यवस्थापक अजय येवले आपल्या घरून निघाले असतांना बेहडी नदीच्या पुलावर साक्री आगाराच्या बसची येवले, प्रकाश भोये आणि एक भाविक या तिघांना धडक बसली. घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी सर्व जखमींना कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता येवले याना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. तर भोये याना नाशिक येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. नाशिककडे जात असताना रस्त्यातच त्यांचाही मृत्यू झाला. कळवण पोलिसात बस चालकाने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविण्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

या अपघातामुळे सोमवारी संतप्त व्यापारी संघटना आणि नागरिकांनी दुकाने बंद ठेवत सकाळी नऊ वाजता संभाजी नगर परिसरात कळवण- नाशिक रस्त्यावर आंदोलन केले. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन तास दुतर्फा वाहतूक ठप्प होती. या आंदोलनात व्यापारी संघटनेचे मोहनलाल संचेती, नगराध्यक्ष कौतिक पगार, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार, शैलेश पवार, जयेश पगार आदी उपस्थित होते.