नाशिक: महानगरपालिकेच्या सिटीलिंक या शहर बस सेवेतील ७०० हुन अधिक चालक, वाहक आणि निरीक्षकांना नाशिक फस्र्ट संस्थेच्या वाहतूक शिक्षण उद्यानात रस्ता सुरक्षेचे प्रशिक्षण देण्यात आले. शहरातील सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाची असलेली बससेवा महानगर परिवहन महामंडळाने सुरू केली आहे. तिला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.
मध्यंतरीची अडीच वर्षे नागरिकांना वाहतुकीसाठी रिक्षाशिवाय इतर पर्याय नव्हता. शहर बससेवा अपघातमुक्त असावी, यासाठी सिटीलिंकचे महाव्यवस्थापक (वाहतूक) मिलिंद बंड यांनी सिटी लिंकच्या सर्व कर्मचार्याना वाहतूक सुरक्षेचे धडे मिळावेत यासाठी नाशिक फस्र्टचे प्रमुख अभय कुलकर्णी यांच्याकडे पाठपुरावा केला. याकरिता संस्थेने खास अभ्यासक्रम तयार केला. त्यात सिटीलिंकचे कर्मचारी आणि नागरिकांच्या जिवाच्या दृष्टीने काय खबरदारी घ्यावी, याचा समावेश करण्यात आला. शहर अपघातमुक्त व्हावे, सिटीलिंकचे देखील अपघात होऊ नयेत यासाठी महानगरपालिका आणि नाशिक फस्र्टच्या सहकार्याने सुरू असलेल्या वाहतूक शिक्षण उद्यानात प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रशिक्षणात चालकांनी शहरात गाडी चालवितांना घ्यावयाची काळजी, रस्ता सुरक्षा आणि अपघात, रस्त्यांचा अयोग्य वापर, रस्त्यावरील अपघात संख्येत वाढ, वाहतूक नियमांचा अनादर, रस्ता सुरक्षेचे नियम व कायदे, भारतातील रस्ते अपघात व रस्ते अपघाताची कारणे व प्रतिबंधक उपाय आदींबाबत माहिती देण्यात आली. चालक व वाहकाने रस्त्यावर येताना शारिरिकरित्या, मानसिकरित्या ताजेतवाने रहाणे, रस्ते वाहतुकीचे नियम, सुरक्षाबाबत माहिती असणे आणि ते पालन करण्याची मानसिकता ठेवणे, वाहनाबद्दलची माहिती असणे, रस्त्यावरील सर्वाचा आदर करणे, योग्य कागदपत्रे जवळ बाळगणे, नियम तोडल्यास त्याचे रुपांतर गंभीर अपघातात कसे होऊ शकते आदींविषयी माहिती देण्यात आली. चालक आणि वाहकांना आरोग्य जपण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी सिटीलिंकचे महाव्यवस्थापक (वाहतूक) बंड, महाव्यवस्थापक (तांत्रिक) वसंत गायधनी यांचे सहकार्य लाभले. नाशिक फस्र्टचे सदस्य श्रीकांत करोडे यांनी अभ्यासक्रम तयार केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Citylinks 700 driver carriers road safety training municipal corporation amy
First published on: 01-04-2022 at 02:36 IST