अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन, प्रात्यक्षिकावर भर

नाशिक : जिल्ह्य़ातील कुपोषणार्थी बाळांची संख्या लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागाच्या मदतीने कुपोषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी खास ‘आहार संहिता’ तयार करण्यात आली असून त्याची प्रभावीपणे अमलबजावणी करण्यासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन, प्रात्यक्षिक  या त्रिसूत्रीवर भर देण्यात येत आहे.

महिला आणि बाल कल्याण विभागाच्या वतीने ग्राम बाल विकास केंद्रात योग्य आहार देण्याच्या मार्गदर्शक सूचना महिला बाल कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल यांनी दिल्या आहेत. याबाबत विभागाकडून आहार संहिता तयार करण्यात आली आहे. संहितेनुसारच आहार देण्याच्या सूचना संबधितांना देण्यात येत असून तालुका आढावा बैठकीत यााबत मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते यांनी सांगितले.

योग्य पोषणमूल्ये असलेला आहार, अन्न न मिळाल्यामुळे कुपोषणाची समस्या निर्माण होत आहे. कुपोषणाची समस्या कमी करण्यासाठी  मानवी शरीरपोषणास आवश्यक असलेला सकस आणि चौरस आहाराची (ज्यामध्ये जीवनसत्त्व, प्रथिने, कबोर्दके, लोह, खनिजयुक्त) कमतरता आणि आजारपणाच्या काळात ताबडतोब जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर औषधोपचार हेच दोन महत्त्वाचे घटक आहेत.

काही बालकांपर्यंत पालकांची आर्थिक क्षमता नसल्याने आहार पोहचत नाही. याबाबत राजमाता जिजाऊ माता – बाल आरोग्य आणि पोषण मिशन या महाराष्ट्र शासनाच्या उपRमांतर्गत अशा बालकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न आहे.

याबाबत आरोग्य आणि आहार संहितेनुसार कोणत्या वेळी कोणता आहार द्यावा याचे वेळापत्रक पालक, अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी यांना देण्यात आले आहे. ग्राम बाल विकास केंद्रामधील तीव्र कुपोषित बालकांना आठ प्रकारचा पोषण आहार दररोज द्यावयाचा असून यामध्ये बालकांना दररोज घरचा आहार तीन वेळा, अंगणवाडीतील आहार दोन वेळा, अंगणवाडीतील ग्राम बाल विकास केंद्रांतर्गत दिला जाणारा विशेष आहार तीन वेळा असा एकूण आठ वेळा आहार द्यायचा. अमायलेजयुक्त आहार कसा तयार करावा, याच्या पद्धतीही देण्यात आल्या आहेत.

तसेच औषधांचे डोस देण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले आहे.

पोषण आहार संहिता

संहितेनुसार अंगणवाडीच्या दोन वेळच्या नियमित आहाराशिवाय या बालकांना ग्राम बाल विकास केंद्रात सकाळी आठ आणि सायंकाळी सहा वाजता अमायलेजयुक्त पिठाची लापशी, शिरा, उपमा, धपाटे किवा धिरडे देण्यात यावेत. दुपारी चार वाजता अंडी न खाणाऱ्या बालकांना केळी, उकडलेले बटाटे आणि इतरांना अंडी, केळी देण्यात यावी. तसेच अमायलेजयुक्त पिठाचा पदार्थ देताना सकाळी गोड पदार्थ देण्यात यावा, सायंकाळी कमी तिखट पाककृती तयार करून बालकांना देण्याची सूचना करण्यात आली. सकाळी आठ वाजता बालक अंगणवाडीत येण्याच्या दोन तास आधी घरचा हलकासा आहार खाऊ  घालून पाठविण्याच्या सूचना पालकांना देण्यात आल्या आहेत. दुपारी १२ ते चार या मध्यंतरामध्ये बालक घरी गेल्यावर दोन वाजता घरचा दररोजचा आहार आणि रात्री आठ वाजता घरचे जेवण बालकाला देण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

मुलांच्या संगोपन आणि पोषणावर भर

मुलांचे संगोपन आणि पोषण व्यवस्थित असेल आणि त्याचे पालक जागरूक असतील, तर कुपोषणाचा प्रश्न कमी होण्यास मदत होते. सकस आहार ही कुपोषण निर्मूलनाची पहिली पायरी आहे. माता आणि बालसंगोपन ही दुसरी, तर आजारी बालकास शक्य तितक्या लवकर चांगले उपचार आणि औषधे मिळणे ही तिसरी महत्त्वाची पायरी आहे. या तीन पायऱ्या जर व्यवस्थितपणे सांभाळल्या तरी कुपोषणाचा गंभीर प्रश्न मोठय़ा प्रमाणात कमी होण्यास निश्चितच मदत होईल. यासाठी आहार संहिता महत्वाची भूमिका निभावेल.

      – डॉ. नरेश गीते , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी