सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी केलेल्या कथित जातीय चिथावणीखोर विधानामुळे आदर्श आचारसंहिता भंग झाल्याबाबत आचारसंहिता नियमावलीत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार नव्याने अहवाल पाठविण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानुसार सातपुते यांच्याकडून झालेल्या आचारसंहिता भंगप्रकरणी निवडणूक आयोगाकडे पुन्हा नव्याने अहवाल पाठविण्यात येणार आहे.

राम सातपुते यांनी निवडणूक प्रचार काळात सोलापुरात मशिदींमधून काँग्रेसला मतदान करण्यासाठी फतवे निघाले आहेत, असा सनसनाटी आरोप केला होता. या आक्षेपार्ह विधानाप्रकरणी त्यांच्या विरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी काही संघटना आणि व्यक्तींनी निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेऊन निवडणूक अधिकाऱ्यांनी सातपुते यांच्या संबंधित आक्षेपार्ह विधानाची चित्रफीत मागवून पडताळणी केली असता त्यात आचारसंहितेचा भंग झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. त्यानुसार पुढील कारवाईसाठी निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठविला होता. याशिवाय निवडणूक काळात पूर्वाश्रमीचे काँग्रेस आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक देवेंद्र राजेश कोठे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सोलापुरातील जाहीर सभेत बोलताना, सोलापुरात नई जिंदगी चौक व शास्त्रीनगर आदी मुस्लीमबहुल भागात ५० हजार बांगलादेशी घुसखोर राहात असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. त्यांच्या या आक्षेपार्ह विधानाबद्दलही तक्रारी प्राप्त झाल्या असता निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी, देवेंद्र कोठे यांच्या विरोधात आचारसंहिता भंगप्रकरणी पुढील कारवाई होण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठविला आहे.

हेही वाचा – बारामतीतील मतदानानंतर अजित पवार ‘नॉट रिचेबल’ असल्याचा आरोप; राष्ट्रवादी काँग्रेसने दिले स्पष्टीकरण; म्हणाले…

हेही वाचा – “राज ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख होण्याची शक्यता”, प्रकाश आंबेडकरांचा दावा; वेळही सांगितली, “शिवशक्ती-भीमशक्तीबाबत म्हणाले…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या विरोधात पाठविलेला अहवाल आचारसंहिता नियमावलीतील मार्गदर्शक सूचनांनुसार पाठविण्यात आला नव्हता. त्यामुळे हा अहवाल आचारसंहिता नियमावलीतील मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पुन्हा नव्याने पाठविण्यात येणार आहे. निवडणूक आचारसंहिता प्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी ही माहिती दिली.