करोना संकटात घरातील परिस्थिती बालकांच्या आरोग्यासाठी लाभदायक

चारुशीला कुलकर्णी, लोकसत्ता

नाशिक : करोनाग्रस्तांमुळे रुग्णसंख्येचा आलेख दिवसागणिक वाढत असताना करोनाचा फैलाव रोखण्याचे आवाहन आरोग्य विभागासमोर आहे. करोनामुळे निर्माण झालेली कौटुंबिक परिस्थिती बालकांच्या पथ्यावर पडली आहे. बाहेरील संपर्क कमी झाल्याने आणि पालक सोबत असल्याने चार महिन्यांपासून जिल्ह्य़ात बालरुग्णांचा दर कमालीचा कमी झाला आहे. जिल्हा परिसरात बालरुग्णांचे प्रमाण कमी होत असताना ग्रामीण भागात कुपोषणाचा मुद्दा मात्र चर्चेत आला आहे.

जिल्ह्य़ात करोनाग्रस्त रुग्णसंख्येने २० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. चार महिन्यांपासून करोनाचा संसर्ग रोखणे हे एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवत आरोग्य विभाग काम करत आहे. यंत्रणा करोनाग्रस्त रुग्णांवर केंद्रित झालेली असताना करोनाबाह्य़ रुग्णांची या काळात परवड झाली. दुसरीकडे या प्रतिकूल वातावरणात बालकांच्या आरोग्यावर अनुकूल परिणाम झाला. टाळेबंदीमुळे पालक आणि बालकेघरातच अडकून पडली. यामुळे पालकांचा सहवास बालकांना मिळाला. तसेच बालकांच्या लहान-मोठय़ा गोष्टींकडे पालकांचे लक्ष राहिले. शहर परिसरात नोकरीच्या रहाटगाडय़ात अडकलेल्या पालकांपैकी काहींच्या नोकऱ्या गेल्या. काही पालकांचे घरूनच काम सुरू आहे. ग्रामीण भागातही स्थलांतरित मजुरांचे प्रमाण कमी झाले. पालक घरात असल्याने मुलांचा बाहेरील वावर कमी झाल्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे.

आदिवासी दुर्गम परिसरात मात्र बालकांच्या कुपोषणाचा मुद्दा पुढे आला आहे. आरोग्यविषयक तक्रारी कमी झाल्या असल्या तरी टाळेबंदीच्या काळात पालकांचा रोजगार गेल्याने पोटाला मिळणारे अन्नही कमी झाल्याने कुपोषणाची तीव्रता वाढत आहे. टाळेबंदीच्या पहिल्या दोन पर्वात पोषण आहार घरपोच दिला गेला. ते अन्नधान्य टाळेबंदीच्या पहिल्या चार पर्वात कुटुंबातील अन्य सदस्यांसह बालकांच्या जेवणात वापरले गेले. आता अंगणवाडी, शाळांमधून दिला जाणारा पोषण आहार थांबल्याने दुर्गम भागात बालकांच्या दोन वेळच्या पोटभर जेवणाचा प्रश्न पालकांसमोर आहे. यामुळे १० वर्षांपुढील बालके शेतमजूर, भाजीपाला विकणे, मिळेल ते काम करत अर्थार्जनाचा प्रयत्न करत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर पोषण आहाराच्या माध्यमातून बालकांच्या कुपोषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षण आणि आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे.

बालकांच्या आरोग्यविषयक तक्रारींमध्ये घट

शहरी भागात जंकफूड खाण्यात असले तरी जेवणात विविधता आली आहे. बालकांचा बाहेरील संपर्क तुटल्याने अ‍ॅलर्जी, सर्दी, खोकला, उलटी, जुलाब, ताप असे वारंवार होणारे आजार कमी झाले. बाहेरचे पचायला जड जाणारे अन्नपदार्थ कमी झाले. मुले पाणीपुरी, भेळ खात असले तरी ती घरी तयार केलेली असते. बिस्कीट किंवा वेफर्स खाल्ले जात आहे. जेवणावेळी जबरदस्तीने का होईना, पूर्ण आहार मुलांच्या पोटात कसा जाईल यासाठी पालक प्रयत्न करत आहेत. सर्दी, खोकला झाला तरी काढा किंवा वाफ असे घरगुती उपाय केले जात आहेत. बालकांच्या एकूणच आरोग्यविषयक तक्रारी कमी झाल्या आहेत.

– वैद्य विक्रांत जाधव

बालरुग्ण नगण्य

रुग्णांचा करोनाग्रस्त तसेच करोनाबाह्य़ विचार केला तर बालरुग्णांची संख्या तुलनेत कमी आहे. सिन्नर तालुक्यात तीन ते चार महिन्यांत ७५० बालरुग्ण आढळले. मात्र त्यात शून्य ते पाच वयोगटातील केवळ १५ बालके होती. मार्चआधीच्या तुलनेत हे प्रमाण नगण्य आहे. बालकांच्या प्रकृतीविषयक तक्रारी कमी झाल्या आहेत.

– डॉ. लहू पाटील  (वैद्यकीय अधिकारी, सिन्नर तालुका)